कुडाळ गवळदेव येथे साजरी होणार पुरुषांची वटपौर्णिमा
पत्नीप्रती सन्मान राखण्यासाठी पुरुष घालतात वटवृक्षाला सात फेरे
गेली १४ वर्षे सुरु आहे उपक्रम
प्रतिनिधी । कुडाळ : जसा पती सातजन्म लाभावा त्याचप्रमाणे कर्तृत्वसंपन्न पत्नी सातजन्मच नव्हे तर जन्मोजन्मी लाभावी. यासाठी खऱ्या अर्थाने स्त्रीच्या कर्तृत्वाचा, धीरोदात्तपणाचा सन्मान करण्यासाठी पुरुषांनी वडाला सात फेरे मारण्याची एक अनोखी परंपरा गेली १४ वर्ष कुडाळ येथे सुरु आहे. येत्या शनिवारी वटपौर्णिमेला सुद्धा हा उपक्रम साजरा होणार आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणामागे एक वैशिष्ट्य दडलेलं आहे. वटपौर्णिमा म्हटल्यानंतर सती सावित्रीचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. आपल्या सौभाग्याच्या म्हणजेच सत्यवानाच्या प्राणरक्षणासाठी सावित्रीने केलेले अथक परिश्रम आठवतात. जीवनातील खऱ्या यशासाठी आवश्यक असलेल्या अनेक गुणांचा तेजस्वी आदर्श सावित्री आपल्यासमोर ठेवते. पतीच्या सुख दु:खात सहभागी होणे, त्याला संकटापासून वाचवण्यासाठी काळालाही आव्हान देण्याची तयारी ठेवणं आणि उभयतांचे जीवन श्रेयोन्मुख करणे हा स्त्रीचा फार मोठा सदगुण आहे. या सदगुणांची शिकवण या सणांमधून मिळते. वास्तविक, स्त्रीच्या शौर्याचा, ध्यैर्याचा, शक्तीचा, बुध्दीचा आणी पराक्रमाचा सन्मान करणारा हा सण आहे.
पत्नीप्रती श्रद्धा भाव– जसा पती सातजन्म लाभावा त्याचप्रमाणे कर्तृत्वसंपन्न पत्नी सातजन्मच नव्हे तर जन्मोजन्मी लाभावी. यासाठी खऱ्या अर्थाने स्त्रीच्या कर्तृत्वाचा, धीरोदात्तपणाचा सन्मान करण्यासाठी पुरुषांनी वडाला सात फेरे मारण्याची एक अनोखी परंपरा गेली १४ वर्ष कुडाळ येथे सुरु आहे.
भगीनी, पत्नी, मैत्रीण, माता अशा विविधांगी स्वरुपाने नटलेल्या स्त्रीच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने चालू असलेल्या या उपक्रमामध्ये उद्या येणाऱ्या वटपौर्णीमेला कुडाळ गवळदेव येथे बहुसंख्य पुरुषांनी उपस्थित राहावे. असे आवाहन बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. उमेश गाळवणकर व डॉ संजय निगुडकर यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.