अल्पवयीन युवतीसह लग्न केले आणि वरात गेली थेट पोलीस स्टेशनमध्ये

कणकवली शहरात बालविवाहाच्या धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ

शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी आणला गैरप्रकार उघडकीस

एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील यांची सतर्कता

कणकवली तालुक्यामधील नेहमीच चर्चेत असणाऱ्या घाट पायथ्यालगत असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह कणकवलीतील एका स्वस्तात मिळणाऱ्या हॉलमध्ये केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. कणकवली शहरातील स्वस्तात मिळणाऱ्या या हॉलमध्ये हा लग्न सोहळा झाला. मात्र याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी हा गैरप्रकार कणकवली तहसीलदारांच्या निदर्शनास आणला व त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. या तक्रारीनंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील यांच्यासह पोलीस प्रशासनाने याची तात्काळ दखल घेतली व लग्न सुरू असलेल्या हॉलच्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत हे लग्न पार पडले होते. त्यानंतर लग्नाच्या मंडपातून ही वरात थेट पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. याबाबत त्या अल्पवयीन मुलीच्या वयाची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता अठरा वर्षे पूर्ण व्हायला त्या युवतीला अद्याप तीन दिवस बाकी असल्याचा समोर आले. दरम्यान याबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कणकवली पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र कणकवली शहरात बालविवाहाचे प्रकार खुलेआम सुरू असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत संबंधित नवरा मुलगा त्याचे आई-वडील व हॉलमालक यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार उघडकीस आला आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!