शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज ठाकरे राहणार उपस्थित

सुनील पवार यांनी दिली माहिती

२ जून रोजी तिथीनुसार रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

प्रतिनिधी । कुडाळ : किल्ले रायगडावर २ जूनला तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणारआहेत अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली. हा सोहळा दैदिप्यमान करण्यासाठी समिती सज्ज झाली आहे.
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड तर्फे गेली अठ्ठावीस वर्षे किल्ले रायगडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार श्री शिवराजाभिषेक सोहळाआयोजित करण्यात येतो. यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष आहे. हा सोहळा संस्मरणीय व्हावा, यासाठी समितीमार्फत किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हिंदू तिथीनुसार साजरा होणाऱ्या या दैदीप्यमान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष, राज ठाकरे यांची दादर येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व त्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित केले.
शककर्ते छत्रपति शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हा आपल्यासाठी भाग्याचा दिवस असून तो तिथी नुसारच साजरा करायला हवा तसेच ३५० व्या शिवराजाभिषेकाच्या अनुषंगाने समितीने दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करून, तिथीनुसार २ जून रोजी साजरा होणाऱ्या या सोहळ्यासाठी मी स्वतः किल्ले रायगडावर उपस्थित राहणार आहे असे राज ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेक प्रसंगी शिवराज्याभिषेक शक सुरू केले होते. त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी पाडव्याप्रमाणे असून, त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरात, आपल्या परिसरातील शिव स्मारके, किल्ले या ठिकाणी गुढी उभारून हा दिवस शिवपाडवा म्हणून साजरा करावा, असेही निवेदन समितीतर्फे श्री ठाकरे यांना दिले. भेटीदरम्यान ठाकरे यांनी महाराज व इतिहासासंबंधी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. शिवछत्रपतींचा इतिहास हा माझ्यासाठी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिला असून तो समितीच्या माध्यमातून लोकांसमोर कसा आणता येईल यासंबंधी चर्चा केली अशी माहिती सुनील पवार यांनी दिली. यावेळी समितीच्या वतीने सनी ताठेले, समीर वारेकर, राजू देसाई, सुनील कदम, संजय ढमाळ, पंकज भोसले, रंजन गावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!