कुडाळ नगरपंचायतची सर्वसाधारण सभा ठरली वादळी

विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
भाजपच्या आरोपाला काही सत्ताधारी नगरसेवकांचा पाठिंबा ?
कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
कुडाळ :
कुडाळ शहरात अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपंचायत प्रशासनाचे याकडे लक्ष वेधूनही प्रशासन बोटचेपी भूमिका घेत आहे. केवळ कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेण्याचे काम कुडाळ नगरपंचायत प्रशासनाकडून होत असून हा सर्व प्रकार म्हणजे ‘आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय’ असाच होत असल्याचा आरोप भाजपा विरोधी नगरसेवकांनी केला. त्याला सत्ताधारी काही नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यावेळी प्रशासनाच्या वतीने कुडाळ शहरात 59 अनधिकृत बांधकामे असल्याचे जाहिर करून त्या बांधकामांच्या यादीचे वाचन करण्यात आले. यावेळी विरोधकांनी नगराध्यक्ष व प्रशासकीय अधिकार्यांवर प्रश्नांचा भडीमार केल्याने काही वेळ सभागृहात वातावरण तंग झाले.
कुडाळ नगरपंचायतची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा आफरीन करोल यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ नगरपंचायतमधील नगराध्यक्षांच्या चेंबरमध्ये संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकारी करिश्मा नायर यांच्यासह नगरसेवक व संबंधित खात्याचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
अनधिकृत बांधकामप्रश्नी विरोधकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अनधिकृत बांधकामे शोधून काढण्याबाबत बिट निरीक्षकांवर जबाबदारी निश्चित केली होती. मात्र त्यांनी ती जबाबदारी निश्चित पार पाडली का? पाडली नसेल किंवा त्यांना अनधिकृत बांधकामे दिसत नसतील तर ती बांधकामे कुठे आहेत? ती आम्ही दाखवून देतो अशी भूमिका विरोधी नगरसेवकांनी घेतली. नक्षत्र टॉवरमध्ये सुध्दा अनधिकृत बांधकाम सुरू होते तेव्हा तक्रार केली. ते बांधकाम आता पुर्ण होवून मालक प्रतिमहिना 20 हजार रुपये भाडे घेत आहे तरी सुध्दा नगरपंचायतकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची खंत नगरसेवक अभिषेक गावडे यांनी व्यक्त करून नगरपंचायतच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रशासनाच्या वतीने संबंधित अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीसा पाठविल्याची माहिती देत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
विषय पत्रिकेवर सूचना करूनही विरोधी नगरसेवकांचे प्रश्न जाणीवपूर्वक टाळले जात असल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी नगराध्यक्षांकडे केला. पाण्यासारखा महत्वाचा प्रश्न असुन सुध्दा तो प्रश्न विषय पत्रिकेवर का घेतला नाही? आम्ही केवळ विषय घेण्याबाबत सत्ताधारी म्हणून तुम्हाला विनंती करतो, तरी सुध्दा तुम्ही ते विषय का घेत नाही? असा सवाल विरोधकांनी केला. यावेळी यापुढे तुम्ही सुचित केलेले विषय घेण्याबाबत विचार केला जाईल असे नगराध्यक्षा करोल यांनी सांगितले. कुडाळ एमआयडीसी भागात रेल्वे प्रकल्पग्रस्त म्हणून असलेल्या 64 कुटूंबियांना 17 रूपये दराने नगरपंचायतकडून पाणीपट्टी आकारली जाते. हा दर अधिक असून पुर्वीप्रमाणे 5 रूपयेच पाणीपट्टीचा दर घ्यावा अशी विनंती सत्ताधारी नगरसेवक किरण शिंदे यांनी केली. त्याला विरोधी सदस्यांनीही सहमती दर्शविली. यावेळी कुडाळ शहरातील बाजार नियोजनाबाबतही चर्चा झाली. प्रशासन केवळ प्रत्येक मिटींगमध्ये बाजार नियोजनाचा प्रश्न विषय पत्रिकेवर ठेवते. मात्र, प्रत्यक्षात अपेक्षित कार्यवाही करत नाही, अशी टिका विरोधी नगरसेवकांनी केली. तसेच गांधी चौक येथे वन-वे केला आणि त्याठिकाणी वन-वेत आलेल्या वाहनचालकाकडून 500 रूपये दंड आकारला जातो. ही रक्कम फार मोठी असून ती रक्कम पोलिस खात्यात जमा होते. त्यामुळे याबाबत विचार होवून नागरिकांना समजेपर्यंत तरी दंड न आकारता. त्या ठिकाणी 15 दिवस तरी पोलिस तैनात करून त्यानंतर दंड आकारणे सुरू करावे, असे नगरसेवकांनी सुचित केले. कुडाळ शहरातील मोबाईल टॉवर वर कर बसविण्यासंबंधी खात्याच्या उपअभियंत्यांना लेखी पत्राने कळविले. मात्र, त्याबाबत कोणतीच माहिती नगरपंचायतला अद्यापही प्राप्त झाली नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी नगरपंचायतच्या बिट निरीक्षकांनी कुडाळ शहर हद्दीत असणार्या मोबाईल टॉवरची माहिती घेवून त्याची नोंद करावी अशी सूचना तेरसे यांनी करून आठ दिवसात त्याची माहिती नगरपंचायतकडे द्यावी असे सांगितले. कुडाळ नगरपंचायत हद्दीत असलेले नगरपंचायतचे (पूर्वी ग्रामपंचायतचे) 73 गाळे कोणत्या कारणासाठी दिले आहेत. आज त्या ठिकाणी कोणते व्यवसाय सुरू आहेत. त्याबाबत प्रशासनाने माहिती घ्यावी. ज्या गाळ्यांमध्ये पोट भाडेकरू आहेत त्यांच्यावर कारवाईसाठी नोटीसा द्याव्यात अशा सुचना करण्यात आल्या. कुडाळ एमआयडीसी येथे घनकचरा निर्मुलन प्रकल्पासाठी नगरपंचायतने प्लॉट घेतला आहे. मात्र, त्याठिकाणी नागरीकांचा त्या प्रकल्पाला विरोध आहे. तरी तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या प्रकल्पासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी नायर यांनी करून तेथील नागरिकांना वेंगुर्ले येथील प्रकल्प दाखवून आणण्याबाबतची सुचना केली. तसेच त्या नागरिकांसोबत आपण एक बैठक घेत असल्याबाबत सुचित केले. त्याला उपस्थित नगरसेवकांनी होकार दर्शविला. तसेच घनकचरा निर्मूलन प्रकल्पासंबंधि प्रशासनाने कायदेशिर बाबींचा अभ्यास करावा केवळ तेथील नागरीकांना वेंगुर्ले येथे घेवून जात अभ्यास दौरा करणे उचित नसल्याचे तेरसे यांनी आपले मत व्यक्त केले. खा. विनायक राऊत यांनी कुडाळ नगरपंचायतकडे आलेले निधी परत केला असल्याची खोटी माहिती दिली. त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे विरोधी नगरसेवक विलास कुडाळकर यांनी सांगितले.
कुडाळ शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी एजन्सी नेमण्यात यावी अशी विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. यावेळी त्या विनंतीला विरोधी नगरसेवक संध्या तेरसे यांनी विरोध केला.
भाजपा नगरसेवकांची मविआ विरोधात निर्दशने
कुडाळ नगरपंचातय कार्यालयाच्या पायरीवर बसून भाजप नगरसेवकांनी महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, मविआचा निषेध असो.. अशा घोषणा देत हातात घोषणांचे फलक धरून निर्दशने केली. बालोद्यान मधील घसरगुंडीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागली केली. तसेच 15 दिवसात 500 कुत्रांवर लाखो रूपयाचा खर्च केला. यातही भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला.
नगराध्यक्ष करोल, नगरसेवक भोगटेत शाब्दिक वाद
भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे सभेदरम्यान उशिराने दालनात हजर झाले. यावेळी त्यांनी मागील बैठकींना अनुपस्थित असुनही मस्टरवर सही कशी मारली? असा सवाल नगराध्यक्ष करोल यांनी उपस्थित करत गटनेते विलास कुडाळकर यांचे लक्ष वेधले. यावेळी भोगटे यांनी तुम्ही हा प्रश्न सोडून कुडाळ शहराच्या विकासासंबंधी प्रश्नांवर चर्चा करा अशी विनंती केली. यावेळी नगरसेवक भोगटे आणि नगराध्यक्ष करोल यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. नगराध्यक्ष करोल यांनी भोगटे यांना आधी खाली बसण्याबाबत सुचित केले. यावेळी नगरसेवक भोगटे यांनी सभाध्यक्ष करोल यांच्याबरोबर अपमानास्पद भाषेत बोलणे केल्याने सभागृह शांतता भंग आणि सभाध्यक्षांचा अवमान केल्याने करोल यांनी भोगटे यांना सभागृहातून बाहेर जाण्याबाबत आदेश दिले. त्यावेळी भोगटे यांनी ते आदेश धुडकावून तुम्ही मला बाहेर काढणाऱ्या कोण ? असा प्रश्न विचारला. यावेळी भाजपच्या अभिषेक गावडे, अॅड. कुडाळकर, संध्या तेरसे या सदस्यांना मध्यस्थाची भूमिका घेत गणेश भोगटे यांना शांत केले.
प्रतिनिधी, कुडाळ