कुडाळात बनावट चेक देऊन व्यापाऱ्यांची फसवणूक

कुडाळ पोलिसांनी आरोपीला ठाण्यातून केली अटक
गणेशनगर येथे इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असल्याचे सांगून विश्वास संपादन करत दोन इलेक्ट्रिकल साहित्य विक्रेत्यांकडून तब्बल १ लाख ७७ हजार ५३३ रुपयांचे साहित्य खरेदी करून बनावट चेक देत फसवणूक करणाऱ्या आरोपीला कुडाळ पोलिसांनी ठाणे येथून ताब्यात घेत अटक केली आहे. विश्रुत भालचंद्र नवाथे (वय ४२, मूळ रा. वडगाव बुद्रुक, पुणे; सध्या रा. घोडबंदर रोड, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २६८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीला कासारवडवली पोलीस ठाणे, ठाणे शहर हद्दीतून ताब्यात घेतले. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पावशी, सिमावाडी येथील मे. सावंत इंटरप्रायझेस येथे गणेशनगर, कुडाळ येथे आपली साईट सुरू असून तेथे इलेक्ट्रिक फिटिंगचे साहित्य आवश्यक असल्याचे सांगितले. विश्वास संपादन करून त्याने दुकानातून १ लाख ३५ हजार ९३३ रुपयांचे इलेक्ट्रिक फिटिंगचे साहित्य खरेदी केले.
त्यानंतर दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी एस.टी. स्टँडसमोर, कुडाळ येथील आदिनारायण इलेक्ट्रिकल्स या दुकानातूनही अशाच पद्धतीने ४१ हजार ६०० रुपयांचे इलेक्ट्रिक फिटिंगचे साहित्य खरेदी केले.
मात्र, साहित्याच्या रकमेच्या पेमेंटसाठी आरोपीने बनावट चेक देऊन फसवणूक केली. चेकचे पेमेंट स्टॉप करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर संबंधित व्यावसायिकांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास कुडाळ पोलीस करीत असून, आरोपीने अशाच प्रकारे अन्य व्यावसायिकांची फसवणूक केली आहे का, याबाबतही तपास सुरू आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक व व्यावसायिकांनी अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास अथवा अशाच पद्धतीने कोणी व्यक्ती विश्वास संपादन करून माल खरेदी करून पेमेंटसाठी चेक दिला असल्यास, नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन कुडाळ पोलिसांनी केले आहे.






