ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराविरोधात कारवाईची मागणी

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
विकासकामांचे ठराव न घेतल्याचा आरोप
ग्रामपंचायत नेरूर तर्फ हवेली येथील ग्रामसेविका श्रीम. मयुरी मछिंद्रनाथ बांदेकर यांच्या कथित मनमानी व निष्काळजी कारभाराची चौकशी करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम ३९ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी कुडाळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत नेरूर तर्फ हवेली ग्रामपंचायत हद्दीत विविध महत्त्वाची विकासकामे प्रस्तावित आहेत. यामध्ये चोपाटी ते गणेश मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण, वसुसे वाडी ते नेरूर जोडरस्ता, श्री तुळजाभवानी मंदिर येथे सभा मंडप व पेव्हिंग ब्लॉक, श्री कालेश्वर मंदिर येथे हायमास्ट, श्री नागदा मारुती मंदिर येथे सभा मंडप व हायमास्ट, बांदिवडेकर टेंब ते सरंबळ रस्ता तसेच नेरूर (गोंधयाळे) येथील श्री भवानी मंदिर सुशोभीकरण आदी कामांचा समावेश आहे.
या कामांसाठी अंदाजपत्रक, नकाशे व हमीपत्र सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाकडून देण्यात आले होते. मात्र, ग्रामसेविकांनी ही कामे मासिक सभेच्या विषयपत्रिकेवर घेऊन त्याबाबतचे ठराव मंजूर करून घेतले नसल्याचा आरोप पावसकर यांनी निवेदनातून केला आहे. त्यामुळे गावातील विकासकामे रखडल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
तसेच, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी शासकीय कामांबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांना उद्धट व असभ्य उत्तरे देऊन अपमानित केले जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, शासकीय पत्रांना वेळेत प्रतिसाद न देणे आणि कर्तव्यात कसूर करणे, अशा गंभीर बाबींची चौकशी करण्याची मागणी पावसकर यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून ग्रामसेविका मयुरी बांदेकर यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३९ अन्वये कडक शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी रुपेश पावसकर यांनी केली आहे. निवेदनासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्राची प्रतही जोडण्यात आली आहे.






