ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी रोटरीचा पुढाकार

माणगावात ११७ विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’चे वाटप

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव येथील इयत्ता दहावीच्या ११७ विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’चे वितरण करण्यात आले.
तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आधुनिक साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास अधिक प्रभावीपणे करता यावा आणि दहावीच्या परीक्षेत चांगले यश संपादन करता यावे, यासाठी रोटरीच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांनी विद्यार्थ्यांना ॲपचा नियमित व जास्तीत जास्त उपयोग करण्याचे आवाहन केले. अभ्यासात सातत्य ठेवून आपल्या गुणांमध्ये वाढ करावी आणि दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवावे, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी रो. राजेंद्र केसरकर, रो. नितीन बांदेकर, रो. वर्षा बांदेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक चव्हाण सर, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
“तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा, मनापासून अभ्यास करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा,” असा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

error: Content is protected !!