कुमारवयीन विद्यार्थ्यांचे भावनिक आरोग्य जपण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

पाट हायस्कूलमध्ये ‘मनमित्र’ उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी मार्गदर्शन सत्र
कुमारवयीन विद्यार्थ्यांच्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक बदलांकडे शिक्षकांनी संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांचे भावनिक आरोग्य जपण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मनोविकास तज्ज्ञ, लेखक व समुपदेशक डॉ. रुपेश पाटकर यांनी केले.
बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने ‘कुमारवयीन मुलांचे भावनिक आरोग्य रक्षण – मनमित्र’ या उपक्रमांतर्गत शनिवार, १५ ऑगस्ट रोजी एस. एल. देसाई विद्यालय, पाट येथे शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात पाट हायस्कूल, परुळे हायस्कूल, माड्याचीवाडी हायस्कूल आणि केळूस हायस्कूल येथील शिक्षक सहभागी झाले होते.
सत्राच्या प्रारंभी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या भावनिक व मानसिक आरोग्याशी संबंधित प्रश्नावली देण्यात आली. त्यानंतर गटचर्चेतून विद्यार्थ्यांच्या विविध समस्या, त्यामागील संभाव्य कारणे आणि अशा परिस्थितीत शिक्षकांची भूमिका यावर विचारमंथन करण्यात आले.
डॉ. पाटकर यांनी कुमारवयीन विद्यार्थ्यांच्या वर्तनातील सूक्ष्म बदल ओळखणे, त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, त्यांच्या समस्या कमी लेखू नयेत आणि गरजेनुसार तज्ज्ञांची मदत घ्यावी, यावर भर दिला. ताण, निराशा, अपयश, नकार, कौटुंबिक अपेक्षा, नातेसंबंधातील गुंतागुंत, एकटेपणा आणि संवादाचा अभाव यांचा विद्यार्थ्यांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या मनात आत्महानीचे विचार निर्माण होण्यामागील संभाव्य कारणे आणि अशा टोकाच्या परिस्थितीला प्रतिबंध करण्यासाठी शिक्षकांनी घ्यावयाची काळजी यावरही विशेष चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि विश्वासाचे वातावरण देणे, त्यांचे म्हणणे निःपक्षपातीपणे ऐकून घेणे आणि योग्य वेळी आवश्यक मदत मिळवून देणे गरजेचे असल्याचे डॉ. पाटकर यांनी सांगितले.
‘नकार पचवण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करा’
अपयश, निराशा आणि नकाराला सामोरे जाण्याची मानसिक तयारी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे. प्रत्येक मागणीला होकार देण्याऐवजी योग्य वेळी ‘नाही’ स्वीकारण्याची सवय मुलांना लागली पाहिजे. वस्तूंची किंमत समजून घेण्याबरोबरच पालकांचे कष्ट, प्रयत्न आणि त्याग यांचे भावनिक मूल्यही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
कुमारवयात निर्माण होणारे आकर्षण, मैत्री, प्रेम आणि भावनिक अवलंबित्व यातील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आवश्यक असल्याचेही डॉ. पाटकर यांनी स्पष्ट केले. भावनेच्या भरात टोकाचे निर्णय न घेता स्वतःच्या भावना ओळखणे, समजून घेणे आणि योग्य पद्धतीने हाताळणे ही भावनिक बुद्धिमत्तेची महत्त्वाची कौशल्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर, डॉ. रुपेश पाटकर, मुक्तांगण वेंगुर्ल्याच्या संचालिका मंगल परुळेकर, सेवांगणचे कार्योपाध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, सचिव खोबरेकर तसेच एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाटचे संस्था सदस्य राजेश सामंत उपस्थित होते.
संपूर्ण सत्र संवादात्मक व विचारप्रवर्तक पद्धतीने पार पडले. शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्नांवर मते मांडली. विद्यार्थ्यांचे भावनिक आरोग्य जपणे ही केवळ पालक किंवा विद्यार्थ्यांची जबाबदारी नसून शाळा, शिक्षक, पालक आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर यांनी केले, तर आभार संस्था पदाधिकारी राजेश सामंत यांनी मानले.






