‘मायनायक भंडारी’ नामकरणाने भंडारी समाजाची मान उंचावली

पालकमंत्री नितेश राणेंच्या भूमिकेबद्दल भंडारी समाजाच्या शिष्टमंडळाकडून आभार

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन सभागृहाला ‘मायनायक भंडारी’ असे नामकरण करून पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भंडारी समाजाचा सन्मान केला असून, जिल्हा भंडारी भवनाच्या माध्यमातून समाजाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाचे जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर व ज्येष्ठ नेते अतुल बंगे यांनी काढले.
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भंडारी समाजाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, ज्येष्ठ नेते अतुल बंगे, माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजू गवंडे, नंदकिशोर कोयंडे, संतोष वैज, बंड्या पराडकर तसेच सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रसाद आरंवदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळाने सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाजाची मोठी संख्या असूनही आजपर्यंत समाजाची अपेक्षित दखल घेतली गेली नव्हती. मात्र, पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. ‘मायनायक भंडारी’ हे नामकरण करून त्यांनी मायनायक भंडारी यांचा इतिहास जिल्ह्यातील जनतेसमोर आणला असून, अखंड भंडारी समाजाचा सन्मान केला आहे, असे शिष्टमंडळाने नमूद केले.
‘मायनायक भंडारी’ या नामकरणाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने जिल्हा नियोजन सभागृहाला भेट दिली. यावेळी जिल्हा भंडारी भवनाच्या प्रस्तावाबाबतही चर्चा करण्यात आली.

गणेशोत्सव काळात भंडारी भवनाचे भूमिपूजन

भंडारी भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम गणेशोत्सवाच्या काळात करण्याचे नियोजन असून, त्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता व पडताळणी करून घेण्याचे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना दिले. राज्य शासनाकडून आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भंडारी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी पालकमंत्री म्हणून आपण सदैव समाजाच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही नितेश राणे यांनी शिष्टमंडळाला दिली.

error: Content is protected !!