तब्बल १८ वर्षांनी कुडाळ-माऊली मंदिर हुमरमळा एसटी बससेवा सुरू

पं. स. सदस्या अर्चना बंगे यांच्या प्रयत्नांना यश

सभापती मिलिंद नाईक यांच्या आदेशानंतर बससेवा पूर्ववत

तब्बल १८ वर्षांपासून बंद असलेली कुडाळ ते वालावल माऊली मंदिर, हुमरमळा एसटी बससेवा अखेर आजपासून सुरू झाली. पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आल्याने विद्यार्थी व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
कुडाळ ते हुमरमळा बससेवा सुरू करण्यात यावी तसेच हुमरमळा ते वालावल मार्गावर वाढलेली झाडी तोडण्यात यावी, अशी मागणी सौ. अर्चना बंगे यांनी पंचायत समितीच्या सभेत केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हुमरमळा ते वालावल मार्गावरील झाडी तोडण्यात आली.
दरम्यान, अलीकडेच झालेल्या पंचायत समितीच्या सभेत सौ. बंगे यांनी हा प्रश्न उपस्थित करताच सभापती मिलिंद नाईक यांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांना सदर बससेवा तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आज कुडाळ आगाराच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बस हुमरमळा येथे दाखल झाली. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचा तब्बल १८ वर्षांचा बससेवेचा वनवास संपला.
यावेळी सरपंच अमृत देसाई, हुमरमळा ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे, बबन प्रभू मळेकर, युवा सेना शाखाप्रमुख संदेश जाधव, लक्ष्मण खरात, दिलीप मार्गी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!