स्वातंत्र्यदिनानिमित्त कुडाळात १७ ऑगस्टला भव्य रक्तदान शिबिर

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचा उपक्रम
”आईये रक्तदान करें, जीवनदान करें” असे आवाहन करत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी कुडाळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सिद्धिविनायक हॉल, कुडाळ रेल्वे स्टेशन रोड, कुडाळ येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे.
सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनकडून गेल्या चार वर्षांपासून सातत्याने सामाजिक सेवा उपक्रम राबविले जात असून, यंदाचे रक्तदान शिबिर हे संस्थेच्या सेवेचे पाचवे वर्ष आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजात जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
“एक छोटा कदम, किसी की नई जिंदगी” या संदेशातून नागरिकांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन फाउंडेशनने केले आहे. रक्तदानामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते, तसेच समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकीही जपली जाते.
शिबिरासाठी १८ ते ६५ वर्षे वयोगटातील, किमान ५० किलो वजन असलेले आणि निरोगी व तंदुरुस्त व्यक्ती रक्तदान करू शकतात. तसेच मागील तीन महिन्यांत रक्तदान केलेले नसणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या सामाजिक उपक्रमात कुडाळ व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून जीवनदानाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनने केले आहे. अधिक माहितीसाठी ९९७०३७३४३९ / ९८९०८००४६० या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.






