मुख्यमंत्र्यांकडे १० कोटींच्या लाईट अँड साऊंड शोसाठी प्रस्ताव

‘सिंधुदुर्ग’साठी आम. प्रमोद जठार यांच्या माध्यमातून रविकिरण तोरसकर यांची मागणी
सिंधुदुर्गला ‘हेरिटेज नाईट टुरिझम’ची नवी दिशा
सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किनारपट्टी परिसरात अत्याधुनिक लाईट, साऊंड व 3D लेझर मॅपिंग शो उभारण्यासाठी BOT (Build-Operate-Transfer) तत्त्वावर १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव १२ ऑगस्ट रोजी मालवणचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून सादर केला आहे.
या प्रस्तावात सिंधुदुर्ग किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारी सामर्थ्य, राजकोट येथील भव्य अश्वारूढ पुतळा, समुद्रकिनारा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडवून जागतिक दर्जाचा पर्यटन अनुभव निर्माण करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. शिवरायांच्या जीवनकार्यावर आधारित लाईट अँड साऊंड शो, 3D प्रोजेक्शन मॅपिंग, मराठा आरमाराचा इतिहास तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील सादरीकरणाचा या प्रकल्पात समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे.
सध्या सिंधुदुर्ग किल्ला, स्कुबा डायव्हिंग, बोट सफारी आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र सूर्यास्तानंतर आकर्षक उपक्रम नसल्याने पर्यटक परत जातात. या प्रकल्पामुळे पर्यटकांचा मुक्काम वाढून ‘वन डे टुरिझम’चे ‘ओव्हरनाईट टुरिझम’मध्ये रूपांतर होईल. परिणामी हॉटेल, होमस्टे, रिसॉर्ट, रेस्टॉरंट, बोट व्यवसाय, स्थानिक मार्गदर्शक, हस्तकला, काजू, आंबा आणि मालवणी खाद्यपदार्थांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळेल, असा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे.
प्रकल्प BOT तत्त्वावर राबविल्यास शासनावरील आर्थिक भार कमी राहील. खासगी संस्थेमार्फत उभारणी, संचालन आणि देखभाल करून निश्चित कालावधीनंतर प्रकल्प शासनाकडे हस्तांतरित करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. यासाठी पर्यटन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या संयुक्त समितीकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
रविकिरण तोरसकर यांनी सांगितले की, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात लाईट अँड साऊंड शोची संकल्पना प्रथम आमदार श्री. जठार यांच्याकडे मांडली होती. त्यानंतर आमदार जठार यांनी राजकोट परिसराची पाहणी करून आमदार निधीतील पहिला १ कोटी रुपयांचा निधी महाराजांच्या चरणी अर्पण केला होता. आता हीच संकल्पना अधिक व्यापक स्वरूपात सिंधुदुर्ग किल्ला आणि संपूर्ण राजकोट किनारपट्टी परिसरासाठी विस्तारून १० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
हा प्रकल्प साकार झाल्यास सिंधुदुर्गला ‘हेरिटेज नाईट टुरिझम डेस्टिनेशन’ म्हणून नवी ओळख मिळून पर्यटन, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला दीर्घकालीन चालना मिळेल, असा विश्वास प्रस्तावात व्यक्त करण्यात आला आहे.






