ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत

सुनिल भोगटे, समिल जळवी यांच्याकडून केंद्र सरकारचे आभार
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे ओबीसी नेते तथा वैशवाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे आणि भंडारी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समिल जळवी यांनी स्वागत केले असून, हा निर्णय ओबीसी समाजासाठी ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जनगणना प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासूनच जातनिहाय जनगणना करण्याची मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली होती. विविध निवेदने, पत्रव्यवहार, पत्रकार परिषद तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे या मागणीला अखेर यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी ४० प्रश्नांची प्रश्नावली तयार केली असून, त्यामधील दहाव्या प्रश्नात ओबीसींचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाची अचूक माहिती उपलब्ध होऊन नियोजन आणि धोरणनिर्मिती अधिक सुसूत्र होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अन्य शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. विविध ठिकाणी निवेदने देऊन आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून जातनिहाय जनगणनेची मागणी प्रभावीपणे मांडण्यात आली होती. या मागणीला अखेर यश मिळाल्याने सुनिल भोगटे आणि समिल जळवी यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.






