कुडाळ बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट
बसमध्ये चढणाऱ्या महिलेकडील दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
कुडाळ एसटी बसस्थानकावर एका महिलेच्या मंगळसूत्रासह अन्य किमती दागिने असलेली पर्स चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. संबंधित महिलेला चोरी करीत असलेला चोरटा निदर्शनास आला. तो पळत जाऊन दुसऱ्या बसमध्ये जाताना त्या महिलेने पाहिले. मात्र, संबंधित बस चालकाच्या असहकार्यामुळे तो पळून गेला, असा आरोप महिलेने केला. सदर घटना कुडाळ बसस्थानकावर रात्री उशिरा घडली.
सदर महिला पणजी येथे लग्न कार्यासाठी जात होती. यावेळी आपले मंगळसूत्र, कानातील सोन्याचे जोड आणि सोन्याची नथ असे साहित्य असलेली पर्स तिने बॅगेत ठेवली होती. कुडाळ बस स्थानकात महाबळेश्वर – पणजी या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून एका चोरट्याने या महिलेच्या पाठीवर असलेल्या बॅगमधील सोन्याचे दागिने असलेली पर्स अलगदपणे काढली. हा प्रकार सदर महिलेच्या लक्षात आला. तिने मागे वळून पाहेपर्यंत चोरटा पळून बस स्थानकातील दुसऱ्या बसमध्ये जावून बसला. यावेळी महिलेने आरडाओरड करीत ती बस थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत बस चालकाने बस मार्गस्थ केली. त्यानंतर पणजी बस कुडाळ पोलिस ठाणे येथे प्रवाशांच्या झडतीसाठी आणण्यात आली. मात्र, दागिने असलेली पर्स सापडली नाही. दरम्यान, त्या चोरट्याने दुसऱ्या एका महिलेच्या बॅगमधील पर्स काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा हा प्रयत्न फसला.
प्रतिनिधी, कुडाळ