गुरुवर्य संगीत भजन स्पर्धेतून गुरूंचे महत्त्व अधोरेखित – मनीष दळवी

वालावलमध्ये गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुरुवर्यांचा देखील मनीष दळवी यांच्या हस्ते सन्मान
गुरुवर्य संगीत भजन स्पर्धेतून गुरूंचे महत्त्व रुजवणे ही आपण जोपासलेली संस्कृती निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. वालावल येथे रविवारी सायंकाळी निमंत्रित गुरुवर्य भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्री देव लक्ष्मीनारायणादि देवस्थान, स्थानिक सल्लागार व्यवस्थापन उपसमिती, वालावल आणि वालावल गावातील भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरुवर्यांचा देखील मनीष दळवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हा भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला सोहळा श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल येथे भक्तीमय वातावरणात पार पडला. भजन स्पर्धेचे उद्घाटन मनीष दळवी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, वालावल सरपंच राजा प्रभू, देवस्थान लक्ष्मीनारायण देवस्थान समितीचे गुरु देसाई, युवा उद्योजक संतोष वालावलकर, आनंद वालावलकर, मनोज वालावलकर उपस्थित होते. यावेळी गुरुवर्य भाऊ देसाई, घन:श्याम वालावलकर, वाय जे देसाई, विनायक आजगावकर, रेखा देसाई, सुषमा प्रभू, सुमती साळसकर, निशा साळसकर, अनंत पाटकर, रामचंद्र वालावलकर, संदीप साळसकर, संदीप प्रभू यांचा मनीष दळवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री दळवी म्हणाले, आजच्या मोबाईल जमान्यात गुरु-शिष्य परंपरा लोप पावत चालली आहे. अशावेळी आपली कोकणची लोक कला भजन ही संस्कृती गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेच्या माध्यमातून वालावल येथे गेले दोन वर्ष सुरू आहे. ही भजन स्पर्धा अखंडित सुरू राहावी आणि आपल्या भजन कलेची संस्कृती जोपासली जावी असे सांगितले. तसेच या परिसरात असणारा तलावाचा जो प्रश्न आहे तो पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चित सोडवला जाईल अशी ग्वाही दिली.
प्रफुल्ल वालावलकर यांनी सांगितले, परमेश्वररूपी सेवा करण्याचे माध्यम भजन या लोककलेत आहे. कित्येक वर्षाची ही भजन लोककला आजही जोपासली जात आहे. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धा गेली दोन वर्षे या ठिकाणी सुरू आहे. भजन स्पर्धेचा हा प्रवास अखंडीत राहील असा विश्वास व्यक्त केला.
प्रास्ताविकात सरपंच राजा प्रभू यांनी निमंत्रित भजन स्पर्धेमागबाबत माहिती दिली या स्पर्धेत जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ वालावल बुवा भूषण घाडी, श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ नेरुर बुवा भार्गव गावडे, श्री महापुरुष प्रसादीक भजन मंडळ पिंगुळी बुवा प्रसाद आमडोसकर, रामकृष्ण हरी सेवा पाठ पंचक्रोशी बुवा आशिष सडेकर, श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी बुवा रुपेश येमकर, श्री समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ मळगाव बुवा गौरांग राऊळ हे सहा निमंत्रित भजन स्पर्धा संघ सहभागी झाले होते. यावेळी भजन स्पर्धेचे परीक्षक मोहन मेस्त्री आणि रूपेंद्र परब तसेच भजनी प्रेमी, निमंत्रित भजन संघ, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले.
दरम्यान या भजन स्पर्धेच्या निमित्ताने रविवारी सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लक्ष्मीनारायण मंदिरला भेट देऊन श्री चे दर्शन घेतले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, चारुदत्त देसाई, गुरु देसाई, निलेश तेंडुलकर आदी उपस्थित होते. वालावलचे बुवा भूषण घडी यांच्या जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळाच्या भजनाने स्पर्धेला सुरुवात झाली.






