सलोनी धुरी जादू विशारद आणि जादू भूषण पुरस्काराने सन्मानित
पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेत गौरव
निलेश जोशी । कुडाळ : मालवण-तारकर्ली येथील कुमारी सलोनी पांडुरंग धुरी हिने पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेत हॅरी हुदिनी मॅजिक कॉम्पिटिशन मध्ये तिसरा क्रमांक पटकावला. तसेच तिला जादू विशारद आणि जादूभूषण सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.
सलोनी पांडुरंग धुरी ही तारकर्ली मालवण येथे राहते. ती बारावी कला शाखेत शिकत आहे. इयत्ता दुसरी पासून तिने जादूचे प्रयोग करायला सुरुवात केली. पोलीस विभागात नोकरी करणारे तिचे वडील पांडुरंग धुरी अर्थात जादूगार एसपी हेच तिचे गुरु आहेत. वडिलांसोबत जादूच्या प्रयोगात काम करता करता तिला जादूची आवड निर्माण झाली. तिने आतापर्यंत 40 ते 50 पेक्षा जास्त जादूचे प्रयोग केलेले आहेत.
तसेच आतापर्यंत तिला जादू विशारद प्रमाणपत्र, जादू भूषण प्रमाणपत्र आणि मेडल हॅरी हुदिनी स्पर्धा पुणे येथे तिसरा क्रमांक आणि सर्टिफिकेट, अखिल भारतीय जादू परिषदेचे प्रमाणपत्र याने सन्मानित आणि चषक अशी बक्षीस मिळाली आहेत. सलोनीला कोरियन डान्स, मेकअप साइडर अँड ब्रायडर, केसांच्या विविध स्टाइल्स करणे, वेगवेगळ्या स्टाईलने साड्या नेसविणे, गाईड प्रशिक्षण, केक प्रशिक्षण, विविध रेसिपी यांची आवड आहे.
भविष्यात मुंबई येथील टीव्ही स्टार जादूगार अतुल पाटील यांच्याकडे अधिक प्रशिक्षणासाठी ती जाणार आहे. तसेच पुणे येथे मास्टर मॅजिशियन आर्यन यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याची तिची इच्छा आहे. तिच्या या यशाबद्दल तिचेसर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.