महाराष्ट्राच्या सागरी विकासाला केंद्राचा भक्कम पाठिंबा!

नीतेश राणेंची केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक
महाराष्ट्रातील बंदर विकास, मत्स्यव्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी पर्यटनाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नीतेश राणे यांनी आज नवी दिल्लीतील परिवहन भवन येथे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेऊन राज्यातील विविध सागरी विकास प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. ‘सागरमाला २.०’ अंतर्गत महाराष्ट्रातील बंदरांचे आधुनिकीकरण, लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करणे, मत्स्य बंदरांचा विकास, किनारी जलवाहतूक आणि अंतर्गत जलमार्गांना चालना देणे, तसेच सागरी पर्यटनाला अधिक गती देण्यासाठी प्रस्तावित विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर यावेळी चर्चा झाली. ‘विकसित भारत @२०४७’ या संकल्पनेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी दिली.






