टाळ-मृदंगाच्या गजरात रंगली आचरे नं. १ केंद्रशाळेची भक्तिमय दिंडी

विद्यार्थ्यांनी साकारली संतपरंपरेची अनुभूती : आचरा तिठा येथे रिंगण सोहळा ठरला लक्षवेधी

ज्ञानोबा-तुकाराम… विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल…” या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने आचरे परिसर भक्तिमय झाला. आषाढी एकादशीच्यानिमित्त केंद्र शाळा आचरे नं. १ येथे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून भक्तिमय दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी पूजन, सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन व आरतीने झाली. शालेय मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री सक्षम पांगम यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची आरती करण्यात आली. नव्या शालेय मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. श्रीविठ्ठल-रुक्मिणी यांच्यासह संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, संत एकनाथ व संत जनाबाई यांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धेचे परीक्षण रुपेश साटम यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक सिद्धेश हळवे, दिपाली खंडगावकर, अनिता पाटील, मीरा बांगर, लोकमान्यचे शाखा व्यवस्थापक नित्यानंद मांजरेकर, विजय मिराशी, विनोद आचरेकर तसेच बाबाराव
खंडगावकर आदी उपस्थित होते.

लहान गटात जुई घाडी, निधी सामंत, ज्ञानदा आचरेकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. तर उत्तेजनार्थ म्हणून परी गावडे, रुद्र पांगम, सखी कांबळी, भूमिका कोळगे, काव्या घाडी, अर्णवी मुणनकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक तर मोठ्या गटात चिराग सामंत, त्रिशा घाडी, ज्ञानेश्वरी मेस्त्री यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. उत्तेजनार्थ म्हणून अंशुमन कांबळी याची निवड करण्यात आली.

यानंतर शाळेपासून आचरा बाजारपेठ मार्गे तिठा अशी भव्य दिंडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अभंगांच्या सुरेल साथीने निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. वारकरी परंपरेतील भक्ती, शिस्त आणि आनंद यांचा सुंदर मिलाफ या दिंडीत अनुभवायला मिळाला. दिंडीदरम्यान आचरा पोलिसांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. आचरा तिठा येथे रिंगण सोहळा आणि दिंडी नृत्य दिंडीतील लक्षवेधी क्षण ठरला.

या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर यांनी दोन हजार रुपयांची देणगी दिली. तसेच मांगिरीश सांबारी यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा दिपाली कांबळी, सदस्य संदीप पांगम, संतोष मेस्त्री, अर्पिता घाडी, पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री सक्षम पांगम, विद्यार्थिनी प्रतिनिधी मनस्वी परुळेकर व अन्य मंत्र्यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!