कोट्यवधींचे बॅडमिंटन कोर्ट दोन वर्षांपासून बंद

ईव्हीएम हटवून खेळाडूंसाठी खुले करा
युवासेनेची आक्रमक मागणी
कुडाळ शहरातील स्थानिक खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट गेल्या दोन वर्षांपासून वापराविना धूळ खात पडले असून, या कोर्टामध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन तात्काळ अन्यत्र हलवून क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुले करावे, अशी आक्रमक मागणी नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कुडाळ शहरातील खेळाडूंना दर्जेदार सरावाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नांतून शासकीय निधीतून हे अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले. मात्र, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून या क्रीडा संकुलाचा वापर खेळाडूंसाठी न होता ईव्हीएम मशीन साठवण्यासाठी केला जात आहे. निवडणुकांचा कालावधी संपूनही अद्याप मशीन हटविण्यात आलेली नसल्याने संपूर्ण क्रीडा संकुल बंद अवस्थेत असून कोर्टावर धूळ साचली आहे.
यामुळे कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीतून उभारलेली सुविधा स्थानिक खेळाडूंना उपलब्ध होत नसल्याने क्रीडाप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने ज्या उद्देशाने हा निधी मंजूर केला, त्याच उद्देशासाठी या क्रीडा संकुलाचा वापर व्हावा, अशी कुडाळवासीयांची अपेक्षा असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
युवासेनेने निवेदनाद्वारे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. बॅडमिंटन कोर्टमध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन तात्काळ अन्य शासकीय गोदामात किंवा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात याव्यात, कोर्टाची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती करून ते त्वरित खेळाडूंसाठी खुले करण्यात यावे तसेच क्रीडा संकुलाच्या नियमित देखभालीसाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
क्रीडाप्रेमी युवकांच्या भवितव्याचा विचार करून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी या प्रश्नात स्वतः लक्ष घालून बॅडमिंटन कोर्ट लवकरात लवकर सुरू करावे. अन्यथा युवासेना पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिला आहे.
यावेळी नगरसेवक संतोष शिरसाट, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, गुरु गडकर, संदीप म्हाडेश्वर, शैलेश काळप, अमित राणे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






