शाळेतून होणारी वह्या, पुस्तके व स्टेशनरी यांची बेकायदेशीर विक्री थांबवा !

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांचे शिक्षण विभागाला पत्र

ह्यूमन राइट संस्था सिंधुदुर्ग यांची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळा मार्फत विद्यार्थ्यांना होणारी वह्या, पुस्तके व स्टेशनरी यांची बेकायदेशीर विक्री थांबवावी अशी मागणी जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. याबाबत ह्यूमन राइट संस्था सिंधुदुर्ग यांनी लक्ष वेधले होते.
जिल्ह्यातील शासकीय व खाजगी शाळा मार्फत विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व स्टेशनरी साहित्य देऊन विक्री करून जी अमाप बेकायदेशीर फी घेतली जाते यासंदर्भात आज ह्यूमन राइट संस्था सिंधुदुर्ग यांनी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांना निवेदन देऊन लक्ष वेधले. यावेळी रुपेश पावसकर यांनी तात्काळ शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांना पत्र देऊन वह्या पुस्तक संदर्भात होणारी लूट तात्काळ थांबवावी अन्यथा जिल्हा परिषदच्या सभागृहात या संदर्भात आवाज उठवून संबंधित शाळा व कॉलेज संस्थांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे रुपेश पावसकर यांनी सांगितले आहे.
विद्यार्थी व पालकांवर होणारा कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही. राजरोसपणे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. असे होत असेल तर पर्यायी कठोर पावले उचलली जातील असा इशारा पावसकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!