सिंधुदुर्गातील सर्व वाहनांना टोल माफी द्या

व्यापारी महासंघ, टोलमुक्‍त कृती समितीची मागणी

पालकमंत्र्यांच्या भेटी नंतर आंदोलनाची दिशा ठरणार

लवकरच सर्व समावेशक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार

मुंबई गोवा हा नवीन महामार्ग झालेला नाही तर असलेला महामार्ग रूंदीकरण करण्यात आलेला आहे. त्‍यामुळे महामार्गाला टोलची गरज नाही. तरीही टोल वसुली करायची असेल तर सिंधुदुर्गातील सर्व वाहनांना या टोलमाफी द्यावी किंवा ओसरगाव येथे पर्यायी राज्‍य मार्ग तयार करावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्‍हा व्यापारी महासंघ आणि टोल मुक्‍त कृती समितीच्यावतीने करण्यात आली. तर टोल वसूलीच्या अनुषंगाने पुढील दोन तीन दिवसांत पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा केली जाईल त्‍यांनतर आंदोलनाचा पुढील दिशा निश्‍चित होईल अशी माहिती समितीच्यावतीने देण्यात आली.
ओसरगाव येथील टोल नाका मे महिन्यापासून कार्यान्वित होणार आहे. त्‍याला विरोध करण्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्‍हा व्यापारी महासंघ आणि टोल मुक्त कृती समिती यांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्‍त बैठक कणकवलीतील शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, टोल विरोधी कृती समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, चंद्रकांत उर्फ राजू जठार, ॲड. नंदन वेंगुर्लेकर, ॲड. नितीन म्‍हापणकर, विनायक मेस्त्री, मनोज वालावलकर आदी उपस्थित होते.
ओसरगाव टोल नाका येथून पथकर वसुलीसाठी यापूर्वी तीन वेळा प्रयत्‍न झाले. तीन वेगवेगळ्या एजन्सी मार्फत टोल वसुलीचा प्रयत्‍न झाला. मात्र व्यापारी महासंघ, टोल मुक्त कृती समिती आणि सर्व जिल्‍हावासीयांच्या तीव्र आंदोलनामुळे टोल वसुली सुरू करता आली नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा एजन्सी नियुक्‍त करून टोल वसुलीसाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत अशी माहिती संजय सावंत यांनी दिली.
द्वारकानाथ घुर्ये म्‍हणाले की, मूळातच ओसरगाव येथे टोल नाका उभा करणे चुकीचे आहे. कारण या टोल नाक्‍यामुळे सिंधुदुर्गची विभागणी होत आहे. जिल्‍हा रूग्‍णालय, जिल्‍हा मुख्यालयात दररोज शेकडो नागरिक जातात. तेथे जाण्या-येण्यासाठी ओसरगाव टोल नाक्‍यावर टोलचा भुर्दंड पडणार आहे. तर नांदगाव येथे लवकरच मार्केट यार्ड तयार होणार आहे. तेथे मालाची वाहतूक करतानाही सिंधुदुर्गातील व्यापारी, शेतकरी यांना टोल द्यावा लागणार आहे.
नंदन वेंगुर्लेकर म्‍हणाले की, महामार्ग चौपदरीकरणाच्या अनुषंगाने कुडाळ येथे झालेल्‍या कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्ग पथकर मुक्‍त असेल अशी ग्‍वाही दिली होती. पण आता वारंवार टोल नाका सुरू करण्यासाठी प्रयत्‍न केले जात आहेत. मूळातच हा नवा महामार्ग नाही. तर असलेल्‍या महामार्गाचे रूंदीकरण करण्यात आले आहे. त्‍यामुळे या महामार्गावर टोल वसुली करणे चुकीचे आहे.
दरम्‍यान टोल मुक्‍त आंदोलनाच्या अनुषंगाने पुढील दोन तीन दिवसांत पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली जाणार आहे. त्‍यानंतर आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय घेतला जाईल असे या बैठकीत निश्‍चित करण्यात आले.

error: Content is protected !!