डॉ. शिल्पा झांटये यांच्या ‘दी गारलँड ऑफ वर्ड्स’ काव्यसंग्रहाचे आचऱ्यात प्रकाशन

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वराच्या साक्षीने श्री रामेश्वर वाचन मंदिरात प्रकाशन सोहळा
डॉक्टरी सेवेबरोबरच साहित्य क्षेत्रात रमलेल्या मालवण येथील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. शिल्पा झांटये यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी निवडक २६ इंग्रजी कवितांचा नवा काव्यसंग्रह आणला आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वराच्या साक्षीने येथील श्री रामेश्वर वाचन मंदिरात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मुले, शिक्षक, पालक यांना डोळ्यासमोर ठेवून या काव्य संग्रहातील कवितांचे लेखन करण्यात आले असून मालवण मधील शालेय आणि सार्वजनिक ग्रंथालयांना हे पुस्तक मुलांच्या वाचनासाठी मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. झाटये यांनी सांगितले.
इनामदार श्री देव रामेश्वराच्या साक्षीने आचरा येथील श्री रामेश्वर वाचन मंदिरात संपन्न झालेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला डॉ. शिल्पा झाटये यांच्यासोबत डॉ. अविनाश झाटये, वाचन मंदिराचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सदस्या सौ. उर्मिला सांबारी, भिकाजीं कदम, श्रीमती वैशाली सांबारी, जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षा सांबारी, सौ. कामिनी ढेकणे, सौ. श्रद्धा महाजनी, ग्रामोपाध्याय निलेश सरजोशी, वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी, श्रीमती सुगंधा गुरव, ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी, महेश बापर्डेकर, सौ. समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण यांसह अन्य मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी डॉ. शिल्पा झाटये यांनी आपल्या दी गारलँड ऑफ वर्ड्स’ काव्यसंग्रहा ची थोडक्यात माहिती देत यातील कवितांचा उद्देश कथन केला. आता मुलांची विचार करण्याची क्षमता बदलत आहे. त्यांच्यात ताणतणाव वाढला आहे. त्याचा परिणाम त्यांच्या मनाबरोबरच त्यांच्या शरीरावर देखील होत आहे. आज घरात पण चिडाचिड होत आहे. हे सगळं बदलावं, यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून हे पुस्तक मी लिहिलं आहे. यापूर्वी १०० कवितांचा संग्रह मी केला आहे. पण त्यात अनेक विषयांवर सन्मिश्र कविता होत्या. यातील २६ निवडक कवितांचा हा संग्रह तयार केला आहे. हे पुस्तक मुलांना आवडेल असे सचित्र पद्धतीने बनवल्याचे सांगून मालवण मधील सार्वजनिक आणि शालेय ग्रंथालयांना हे पुस्तक मोफत देणार असल्याचे त्या म्हणाल्या. अन्य वाचकांना हे पुस्तक वाचनासाठी हवे असल्यास झाटये हॉस्पिटल रेवतळे येथे नाममात्र १५० रुपयात हे पुस्तक उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना निलेश सरजोशी म्हणाले, डॉ. झांटये यांनी साध्या इंग्रजी मधून कविता लेखन केले आहे. कविता केली जात नाही, ती आतून यावी लागते. त्यासाठी सहृदयता लागते, ती डॉ. शिल्पा झाटये यांच्याकडे आहे. त्यानी आपल्या आयुष्यात जो खडतर तप केला आहे, त्या तपश्चर्येंचा हा परिणाम आहे, असे ते म्हणाले. यावेळी अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी रामेश्वर वाचन मंदिराचा आढावा घेत माहिती दिली. तर डॉ. अविनाश झाटये, मंदार सांबारी, ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांनीही विचार मांडले. अर्जुन बापर्डेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. शिल्पा झाटये, डॉ. अविनाश झाटये यांचा वाचनालयाच्या वतीने शाल, श्रीफळ, ज्ञानेश्वरी देऊन सन्मान करण्यात आला.





