मराठीतली स्वाक्षरी ही व्यक्तिमत्त्वाची ओळख – सुरेश ठाकूर

‘माझी आकर्षक मराठी स्वाक्षरी’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
दहा उत्कृष्ट स्वाक्षऱ्यांचा गौरव
आपली सुंदर आणि आपल्या मातृभाषेत साकारलेली स्वाक्षरी हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आहे. अभिजात मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना प्रत्येकाने आपली स्वाक्षरी मराठीतूनच केली पाहिजे, असे प्रतिपादन सुरेश शामराव ठाकूर यांनी केले.
कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझी आकर्षक मराठी स्वाक्षरी’ या अभिनव स्पर्धेच्या कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. हा उपक्रम कोमसाप कार्यालय, आचरा येथे उत्साहात पार पडला.
या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत ११४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी उत्कृष्ट अशा दहा मराठी स्वाक्षऱ्यांची निवड करण्यात आली.
विजेत्यांमध्ये अशोक कांबळी, डॉ. प्रमोद कोळंबकर, गिरीधर पुजारे, बाळकृष्ण बिडये, त्रिंबक आजगावकर, दिव्या परब, श्रावणी प्रभू, प्रसन्ना ठाकूर, वर्षाराणी अभ्यंकर आणि दीपाली खंडगावकर यांचा समावेश आहे.
स्पर्धेचे परीक्षण रामचंद्र कुबल आणि सुरेंद्र सकपाळ यांनी केले. विजेते स्पर्धक तसेच परीक्षकांचा माजी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती मालवणदत्तात्रय मुळीक आणि माधव गावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हस्ताक्षरमहर्षी विकास गोवेकर लिखित पुस्तक आणि सन्मानपत्र देऊन सर्वांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी पांडुरंग कोचरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. मातृभाषेतील स्वाक्षरीचा प्रसार आणि मराठी भाषेविषयी अभिमान जागविणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.






