नवीन शैक्षणिक धोरण । शालेय शिक्षण मंत्र्यांनी ‘या’ प्रश्नांची उत्तरे द्यावीत !

संस्थाचालक तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईर्षाद शेख यांचे आवाहन

प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : शालेय शिक्षणमंत्र्यानी नविन शैक्षणिक धोरण येत्या शैक्षणिक वर्षांपासून लागू करणार असल्याचे सांगीतले परंतू याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी करणार याबद्दल संस्था चालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्यासाठी शासनाने व शिक्षणमंत्री महोदयांनी या माझ्या खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शिक्षण संस्था चालक इर्शाद शेख यांनी केले आहे.

  1. नवे शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी या दोन-तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे काय?
  2. आता आर्टस, काॅमर्स, सायन्सऐवजी नववीपासूनच संबंधित शाखांचे विषय निवडून ते बारावीपर्यंत घ्यायचे आहेत. त्यादृष्टीने आवश्यक असलेली नवी पुस्तके छापून पूर्ण होणार आहेत का?
  3. दहावी बोर्डपरीक्षे ऐवजी नववी ते बारावी दर वर्षी दोन सेमिस्टरमध्ये परीक्षा होऊन ते मार्क्स बारावीच्या अंतिम परीक्षेतही मिळवले जाणार आहेत.
    या नववी ते बारावी वर्गांना शिकवणारे शिक्षक कोण असणार आहेत? त्यांची नेमणूक नव्याने होणार की जुने शिक्षकच शिकवणार? त्यांची शैक्षणिक पात्रता नवीन अभ्यासक्रम शिकवण्यासाठी योग्य असणार आहे का? किंवा नवीन शिक्षक भरती करायची असेल तर कधी करणार त्यांचा पगार स्केल इ. काय असणार आहे? नव्या पॅटर्नला अनुसरून त्यांचे प्रशिक्षण होणार आहे का? आणि ते कधी होणार आहे?
  4. नववी ते बारावी पर्यंतचे विषय पारंपरिकच असणार आहेत (उदा. विज्ञान,इतिहास,अकाउंटन्सी इ.) की त्यात कालनिहाय काही नवे विषय (उदा. फलज्योतिष, गोमूत्रचिकित्सा इ.) अंतर्भूत होणार आहेत?
  5. आता दहावीपर्यंत माध्यमिक व अकरावी बारावी उच्चमाध्यमिक असा पॅटर्न संपुष्टात येणार असल्याने आधीच्या पॅटर्नप्रमाणे ज्या माध्यमिक शाळा फक्त दहावीपर्यंतच आहेत व जे उच्च माध्यमिकचे वर्ग सिनियर काॅलेजला जोडलेले आहेत, तिथे नवा पॅटर्न कसा राबवला जाणार आहे?
  6. पूर्वमाध्यमिक (पाचवी ते आठवी) व माध्यमिक (नववी ते बारावी) वर्ग एकाच इमारतीत भरणार असतील तर वेगवेगळे विषय कसे शिकवणार वेळेचे,वर्गखोल्यांचे नियोजन कसे राहील? सर्व शाळा या दृष्टीने सक्षम आहेत का?
  7. माध्यमिक शाळा ज्या सध्या दहावी पर्यंत आहेत तेथेच पुढील अकरावी बारावी सुरू झाल्यास पदवी महाविद्यालयाना जोडून असणारी आताची ज्युनियर कॉलेजला अकरावी बारावीसाठी विद्यार्थी कुठून मिळणार आणि तेथे काम करणाऱ्या शिक्षकांचे काय होणार?
  8. या सर्व वर्गांसाठी विद्यार्थी संख्येचा निकष काय असणार आहे?
  9. विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थाचालक यांना या संदर्भात विश्वासात घेतले गेले आहे काय?
    असे एक ना अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. शिक्षण मंत्री व महाराष्ट्र शासन यांनी याबाबत संस्थाचालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा संभ्रम दूर करावा अन्यथा काहीतरी करून दाखवण्याच्या नादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल याला जबाबदार कोण?असा प्रश्न इर्शाद शेख यांनी विचारला आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!