कणकवली रेल्वे स्टेशन बाहेरील भागाच्या छताच्या सिलिंग चा भाग कोसळला

कामाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित
कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या शिवसेना ठाकरे गटाची घटनास्थळी धाव घेत मागणी
गेल्या वर्षीच नव्याने केलेल्या व मोठा गाजावाजा झालेल्या कणकवली रेल्वे स्टेशनच्या स्टेशन बाहेरील रिक्षा स्टॅन्ड नजीक केलेल्या छताच्या सिलिंग चा काही भाग आज शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. कोसळलेली सिलिंगची प्लेट ही वरतीच अडकून लोबकळत राहिली. यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हे सिलिंग कोसळल्याची माहिती मिळतात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेत कामाच्या निकृष्ट कामाच्या दर्जाची चौकशी करण्याची मागणी केली. या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी देखील शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.
कणकवली रेल्वे स्टेशन बाहेरील भागाचे गेल्या वर्षीच सुशोभीकरण करण्यात आले होते. कणकवली रेल्वे स्टेशनला जणू काही विमानतळाचा लुक असावा असे काम या ठिकाणी करण्यात आले. मात्र त्यानंतर या कामाच्या दर्जाबाबत आरोपही झाले. गतवर्षी ज्या कामाच्या ठिकाणी बसवलेल्या गवारेड्याची शेपटी तुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता वर्षभरात पुन्हा रेल्वे स्टेशनच्या बाहेरील भागात केलेले सिलिंग चा काही भाग कोसळल्याने पुन्हा एकदा या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही घटना घडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, कन्हैया पारकर, सतीश परब, सतीश मर्गज, चंद्रकांत सावंत, किरण रेडकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.