डॉ. अनिल नेरुरकर प्रेरित प्रज्ञांगण तळेरे येथे महिलांसाठी सर्वसमावेशक तिळगुळ समारंभाचे आयोजन

सामाजिक ऐक्य व महिला सक्षमीकरणाचा उपक्रम – यंदाचे सहावे वर्ष
महिला सक्षमीकरण आणि समाजाच्या जडणघडणीसाठी महिलांनी एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे, या भावनेतून तळेरे येथे येत्या रविवार, २५ जानेवारी २०२६ (रथसप्तमी) रोजी श्रावणी कंप्युटर येथील प्रज्ञांगण सभागृहात सर्व महिलांसाठी तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची वेळ सायंकाळी ३.३० वाजता ठेवण्यात आली आहे.
पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रम हा प्रामुख्याने सौभाग्यवती महिलांपुरता मर्यादित असतो. मात्र, सामाजिक समतेचा विचार पुढे नेत सौभाग्यवती व विधवा अशा सर्व महिलांसाठी एकत्रित तिळगुळ समारंभ आयोजित करण्याचा वेगळा पायंडा येथे घालण्यात आला आहे. या उपक्रमात विधवा महिलांकडून सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, जिजामाता व झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा महान वीर महिलांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येते, तर सौभाग्यवती महिलांकडून विधवा महिलांना प्रथम तिळगुळाचा मान दिला जातो.
सामाजिक ऐक्याचा हा सकारात्मक विचार गेली पाच वर्षे महिलांच्या एकत्रित सहभागातून सातत्याने जपला जात असून यंदाचे हे सहावे वर्ष आहे. या समारंभातून केवळ वाणाची देवाण-घेवाण न करता सन्मान, संवाद, आत्मसन्मान आणि वैचारिक परिवर्तनाचा संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो.
महिला सक्षमीकरण, व्यक्तिमत्त्व विकास, समाजजागृती आणि मूल्याधारित सामाजिक बदलासाठी प्रज्ञांगणच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप मिळावे, यासाठी तळेरे दशक्रोशीतील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, बचत गट प्रतिनिधी, शिक्षिका तसेच विविध स्तरांतील महिलांनी स्वतः सहभागी होऊन इतर महिलांनाही या कार्यक्रमासाठी प्रेरित करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महिलांच्या एकजुटीतूनच समताधिष्ठित आणि आदर्श समाजनिर्मिती शक्य आहे, असा विश्वास व्यक्त करत या तिळगुळ समारंभासाठी सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रावणी सतीश मदभावे यांनी केले आहे.





