खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद कुरंगवणे खैराट येथे संपन्न; विविध शैक्षणिक उपक्रमांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रवाह, उपक्रम आणि प्रशासकीय कामकाज यांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खारेपाटण व शेर्पे केंद्रस्तरीय संयुक्त शिक्षण परिषदेचे आयोजन आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुरंगवणे खैराट येथे करण्यात आले. या परिषदेत दोन्ही केंद्रांतील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध शैक्षणिक विषयांचे सखोल प्रशिक्षण घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात झाली. शाळेच्या मुलींनी ‘गुरु ईश्वर तात माय’ हे श्रवणीय ईशस्तवन आणि ‘हा स्वागताचा सोहळा’ हे स्वागतगीत अत्यंत सुश्राव्य सुरात सादर करून उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, उपशिक्षक आणि मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन राजू गर्जे यांनी केले.
यानंतर सुरू झालेल्या शैक्षणिक सत्रात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी 'डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी' कार्यक्रमांतर्गत शीतल राठोड यांनी मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन सुलभ करण्यासाठी 'खान अकॅडमी' बाबत आशा भोर यांनी माहिती दिली. तसेच, राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'निपुण महाराष्ट्र अभियाना'ची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, यावर वेदिका चव्हाण यांनी प्रकाश टाकला. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अचूक व्हावे यासाठी 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन' विषयावर मंगेश खांबाळकर यांनी मार्गदर्शन केले, तर शाळांना लोकसहभागातून समृद्ध करण्यासाठी 'विद्यांजली पोर्टल'चा वापर कसा करावा, याची सविस्तर माहिती शुभांगी गुरव यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासार्डे, शेर्पे व कणकवली केंद्राचे केंद्रप्रमुख संजय पवार होते. त्यांनी उपस्थित शिक्षकांना प्रशासकीय कामकाजाबाबत मार्गदर्शन करतानाच, शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी खारेपाटण नं. १ चे मुख्याध्यापक प्रदिप श्रावणकर, नडगीवे नं. १ च्या मुख्याध्यापिका अनिता पाटकर आणि दोन्ही केंद्रातील बहुसंख्य शिक्षकवृंद उपस्थित होते.
ही शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी कुरंगवणे खैराट शाळेचे मुख्याध्यापक श्रीपाद बागडी, तसेच शिक्षक राजू गर्जे, शारदा तांदळे आणि रेखा डिसले यांनी अथक परिश्रम घेऊन परिषदेचे उत्तम नियोजन केले. या संयुक्त शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांना नवनवीन शैक्षणिक संकल्पना व उपक्रम समजून घेण्यास मोठी मदत झाली.





