पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासहित प्रमुख नेत्यांची भाजपा कार्यालयात बैठक

संपूर्ण जिल्ह्यात महायुती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वीच मांडली होती महायुती बाबत भूमिका

कणकवलीतील महायुती बाबतही निर्णय होण्याची शक्यता?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुका या महायुती म्हणूनच लढविल्या जाव्यात असे मत केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत व्यक्त केल्यानंतर या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. त्यातच कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे व शिंदेंची शिवसेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याबाबत देखील चर्चा सुरू असतानाच आज जिल्हा भाजपाच्या ओरोस येथील कार्यालयात शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासहित प्रमुख नेत्यांची महायुती संदर्भात चर्चा झाल्या ची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्याबाबतचे फोटो कोकण नाऊच्या हाती लागले असून या बैठकीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या दृष्टीने पहिले पाऊल पडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय झाला? याबाबत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी महायुतीच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाटचाल सुरू झाली असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहित प्रमुख पदाधिकारी व शिंदे शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे देखील भाजपा कार्यालयात एकत्र आल्याने आता या बैठकीमध्ये महायुती संदर्भात काय निर्णय घेतला गेला? किंवा अंतिम निर्णय केव्हा होणार? त्याची उत्सुकता आता सर्वत्र लागून राहिली आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!