कणकवलीतील मुडेश्वर मैदानावरील आरक्षण रद्द न झाल्यास २६ मार्चपासून उपोषण छेडणार

शहर विकास आराखड्यात या जागेवर पुन्हा स्पोर्ट कॉम्प्लेक्स चे आरक्षण
जमीन मालकांनी एकत्र येत आज घेतला निर्णय
कणकवली नगरपंचायत शहर विकास आराखड्यात मुडेश्वर मैदान परिसरात पुन्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे आरक्षण टाकण्यात आले आहे. हे आरक्षण रद्द न केल्यास उपोषण छेडणार असल्याचा इशारा जमीन मालकांनी आज या ठिकाणी एकत्र येत दिला. येथील मुडेश्वर मैदानावर कणकवलीतील जमीन मालकांची बैठक झाली. यात शेखर राणे, मारूती राणे, विवेक राणे, दीपक राणे, माजी नगरसेवक उमेश वाळके, बाळू राणे आदी उपस्थित होते. यावेळी शेखर राणे म्हणाले की, नगरपंचायतीची स्थापना होण्यापूर्वी मुडेश्वर मैदान हा परिसर औद्योगिक झोन म्हणून निश्चित झाला होता. हा झोन पंचवीस वर्षे कायम होता. नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर येथील ११४० गुंठे क्षेत्रात स्टेडियम साठी आरक्षण टाकण्यात आले. मात्र मागील पंचवीस वर्षात ही जागा नगरपंचायतीला ताब्यात घेता आलेली नाही. आता शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये येथील जागेवर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यामुळे सन २०४६ पर्यंत ही जागा पुन्हा एकदा आरक्षित झाली आहे. वर्षानुवर्षे ही जागा आरक्षित ठेवली जात आहे. ही जागा नगरपंचायत ताब्यात घेत नाही, तसेच स्थानिकांनाही विकसित करता येत नाही. त्यामुळे आता या जागेवरील आरक्षण रद्द व्हायला हवे.
माजी नगरसेवक उमेश वाळके म्हणाले की, मागील आराखड्यात येथे तब्बल ११४० गुंठे क्षेत्रात स्टेडियम होणार होते. मात्र ते प्रत्यक्षात साकार झाले नाही. आता नव्या आराखड्यात स्टेडियम रद्द करून तेथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यासाठी ११४० गुंठे ऐवजी २५० गुंठे एवढीच जागा निश्चित करण्यात आली आहे. तर उर्वरीत जागा ग्रीन झोन म्हणून निश्चित करण्यात आलीय. याचा अर्थ नगरपंचायतीला मुडेश्वर मैदान परिसरात काहीही करायचे नाही. फक्त जागा अडकवून ठेवायच्या आहेत. त्यामुळेच आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान मुडेश्वर मैदान परिसरातील आरक्षण रद्द करण्याबाबत गुरूवारी 5 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता दत्तमंदिर कणकवली येथे सर्व जमीन मालकांची बैठक होणार आहे. यात आरक्षण रद्द होण्यासाठी २६ मार्च पासून बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्याबाबतचा निर्णय होणार आहे. या बैठकीला सर्व जमीन मालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेखर राणे, उमेश वाळके यांनी केले आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





