कणकवली काँग्रेसच्या भूमिके नंतर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तातडीने काँग्रेस निरीक्षकांच्या भेटीला

महाविकास आघाडी टिकवण्यासाठी शिवसेना ठाकरे सेनेकडून प्रयत्न सुरू

काँग्रेस पक्ष निरीक्षक तौफिक मुल्लाणी म्हणतात ही खाजगी भेट

कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने आज कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीदरम्यान काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले काँग्रेस पक्ष निरीक्षक ॲड. तौफिक मुल्लाणी यांनी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने चाचपणी करत असून नगराध्यक्ष पदासहित 13 जागांवर उमेदवारी साठी पक्षाकडे मागणी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने ही भूमिका घेतल्यानंतर काही तास उलटत नाहीत तोच युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तातडीने आज काँग्रेस कार्यालयात पक्ष निरीक्षक मुल्लाणी यांची भेट घेत चर्चा केली. त्यावेळी ही खाजगी स्वरूपातील भेट असल्याचे मुल्लाणी यांनी स्पष्ट केले. मात्र काँग्रेस कडून स्वबळावर कणकवली नगरपंचायत निवडणूक लढविण्याबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी टिकवण्यासाठी ठाकरे शिवसेनेकडून या भेटी मुळे जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत. काँग्रेसच्या कणकवलीतील कार्यालयात सुशांत नाईक व काँग्रेसचे पक्ष निरीक्षक यांची भेट झाली. त्यावेळी काँग्रेसचे तालुका पक्ष निरीक्षक प्रवीण वरूनकर, विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांच्यासहित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान ही भेट वैयक्तिक स्वरूपाची असल्याचे काँग्रेसचे मुल्लाणी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. काँग्रेसच्या भूमिके नंतर ठाकरे शिवसेनेकडून काँग्रेस सोबत महाविकास आघाडीसाठी प्रयत्न सुरू केल्याने येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी होणार की? काँग्रेस व स्वतंत्र लढणार ते पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!