रस्त्यावरच्या वंचित बालकांना आनंददायी शिक्षणाचा हक्क मिळावा.…….संदिप परब, अध्यक्ष, जीवन आनंद संस्था.

कार्व्हर डे सेंटर कडून रस्त्यावरील बालकांसाठी नेहरू विज्ञान केंद्र येथे सहलीचे आयोजन

राष्ट्रीय विज्ञान दिनी संपन्न झाली रस्त्यावरील बालकांची सहल.

मुंबई: …….” आज रस्त्यावर दारिद्र्य च्या कारणाने वंचित अवस्थेत जीवन जगत असलेली बालके ही उद्याच्या भारताची नागरिक आहेत. त्यांना आनंददायी शिक्षणाची संधी आणि शिक्षणाचा हक्क मिळायला हवा.” असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांनी जीवन आनंद संस्थेने नेहरू विज्ञान सेंटर येथे आयोजित केलेल्या सहलीच्या पार्श्वभूमीवर बोलताना केले.

रस्त्यावर राहणाऱ्या बेघर वंचित बालकांच्या आयुष्यात आनंद आणि प्रेरणेचा क्षण निर्माण करत जीवन आनंद संस्थे तर्फे कार्यरत कार्व्हर डे सेंटरने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विशेष अभ्यास सहलीचे आयोजन केले.नेहरू सायन्स सेंटर येथे संपन्न झालेल्या या सहलीसाठी  जाण्यासाठी बालकांनी जीवनात प्रथमच सांताक्रूझ ते नेहरू विज्ञान सेंटर भुयारी मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला.

जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार, बेघर वंचित बांधवांच्या पुनर्वसनासाठी तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग तसेच गोवा राज्यात आश्रम व शेल्टर होमच्या माध्यमातून कार्यरत आहे. मुंबईतील खाररोड येथे दारिद्र्यामुळे कुटुंबासह पदपथावर राहणाऱ्या नागरिकांच्या बालकांसाठी संस्था डे केअर सेंटर चालवित आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या अभ्यास सहलीत कार्व्हर डे सेंटरमधील १७ बालकांनी तसेच संस्थेच्या मुंबई विभागातील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि बालकांच्या जिज्ञासेला चालना मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
नेहरू सायन्स सेंटरमध्ये बालकांनी विविध वैज्ञानिक प्रयोग, हाताळणीद्वारे शिकवणारे मॉडेल्स आणि विज्ञानाधारित खेळ अनुभवले. प्रत्यक्ष सहभागातून विज्ञान समजून घेताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत होती.

या उपक्रमामुळे रस्त्यावरच्या वंचित बालकांना केवळ शैक्षणिक अनुभवच नव्हे तर समाजात आपणही तितकेच सक्षम आहोत, हा आत्मविश्वास देणारा सकारात्मक अनुभव मिळाला. जीवन आनंद संस्थेचे असे उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत वंचित बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. कार्व्हर डे सेंटरचे मिना पटेल, श्रेया घाडीगावकर, कविता कदम, गोविंद मार्गी, रूपेश गावडे यांची सहलीच्या संयोजनात भूमिका राहिली. विश्वस्त किसन चौरे आणि प्रज्ञा राणे यांचा सहभाग होता.

error: Content is protected !!