कौटुंबिक वादातून कालेली येथे पतीचा पत्नीवर हल्ला

सासऱ्याविरुद्ध सुनेची कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार
संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी
सून आणि मुलाची बाजू घेतली याचा राग मनात ठेवून रमेश गणपत चव्हाण (वय 57, रा. कालेली-आंगचेकरवाडी, ता. कुडाळ) यांने आपली पत्नी रेश्मा रमेश चव्हाण (वय 55, रा. कालेली-आंगचेकरवाडी, ता. कुडाळ, ) हीचा गळा आवळून जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याची फिर्याद सून वैदेही विकास चव्हाण (वय 32, मूळ रा. कालेली-आंगचेकरवाडी, ता. कुडाळ, सध्या रा. सांताक्रूझ-मुंबई) यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. याप्रकरणी संशयित रमेश गणपत चव्हाण याला कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. गणपत चव्हाण याला आज कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या रेश्मा चव्हाण यांना उपचारानंतर मुलाच्या सासुरवाडीला मुळदे येथे हलविण्यात आले आहे. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
संशयित रमेश गणपत चव्हाण याची सून वैदेही विकास चव्हाण यांनी कुडाळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रमेश गणपत चव्हाण हे तिचे सासरे आहेत. ते त्यांची पत्नी रेश्मा हिच्यासह कालेली – आंगचेकरवाडी येथे राहतात. तर त्यांचा मुलगा विकास, त्याची पत्नी वैदेही, मोठी मुलगी आर्वी असे सांताक्रूझ-मुंबई येथे राहतात. सून वैदेही हि सध्या दुसऱ्या प्रसूतीसाठी कालेली येथे आपल्या सासरी आलेली आहे. तर सध्या तिचा पती विकास हा देखील १८ फेब्रुवारी पासून रजा घेऊन गावी आलेला आहे. प्रसूतीनंतर सून वैदेही हि तिच्या माहेरी मुळदे येथे राहत होती. पण तिच्या सासऱ्यांनी म्हणजेच संशयित रमेश चव्हाण याने तिला जबरदस्तीने कालेली येथे आणले.
दि. 26/02/2026 रोजी घरी रात्रीचे ८ वाजण्याच्या सुमारास सून वैदेही किचनमध्ये भाकरी करत होत्या. त्यावेळी त्यांचे सासरे रमेश किचनमध्ये आले व ‘मी तुझ्या हातचे जेवण खानार नाही. तु बाजुला सरक, मी माझे जेवण बनवतो’, असे म्हणत सुनेशी वाद घातला. त्यावेळी सुनेने त्यांना सांगीतले की 5 मीनीटात भाकरी भाजुन घेते व बाहेर जाते. त्यांनी सुंसह काही ऐकुन घेतले नाही व तिला शिवीगाळ करत बाजुला होतेस का तुझा मुडदा पाडू अशी धमकी दिली. त्यामुळे ती घाबरुन बाहेर निघुन गेली. त्यावेळी तिच्या सासूबाई रेश्मा यांनी आपल्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सासूला शिवीगाळ करुन मारहाण केली व परत ‘माझ्या आडवी आलीस तर तुझाच पहिला मुडदा पाडतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर सुनेने कुडाळ पोलीस ठाणे येथे जात झाले प्रकाराबाबत तक्रार दाखल केली.
दि. 27/02/2026 रोजी सून वैदेही यांनी तिचे पती विकास, मोठी मुलगी आर्वी व लहान मुलगी हितीका असे सासऱ्यांच्या भीतीने तिच्या माहेरी मुळदे येथे जाण्याचे ठरविले होते. त्याचवेळी दुपारी साडेबारा वाजता सासरे रमेश चव्हाण आले आणि त्यांना तिघाना शिवीगाळ करु लागले. पण सून, तिचा पती आणि मुलीने काही न बोलता जेवण केले. त्यांनतर वैदेही आणि तिचा मुलींना सोबत घेवुन तिच्या माहेरी मुळदे येथे निघुन गेले. मुळदे येथे पोचल्यावर वैदेहीच्या पतींना गावातील पोलीस पाटील गणेश कालेलकर यांनी फोन करुन सांगीतले की, यांचे सासरे रमेश यांनी सासू रेश्मा हिला घरातील कोयत्याने डोक्यात मारले असुन तीला कुडाळ येथे दवाखान्यात नेले आहे.
त्यानंतर वैदेही आणि तिचा पती विकास असे लागलीच ग्रामिण रुग्णालय कुडाळ येथे पोहोचले. त्यांची सासु रेश्मा यांचेवर उपचार चालू होते. वैदेही व त्यांचे पती सासुबाईना भेटले त्यावेळी तिच्या सासुबाईंनी त्यांना सांगीतले की, तुम्ही घरातुन निघुन गेल्यानंतर अंदाजे दुपारचे अडीज वाजण्याच्या चे सुमारास त्या बेडवर पडल्या असता, सासरे रमेश यांनी बेडजवळ येवुन तिला लाथ मारुन ‘तुला मुलगा व सुनेची बाजु घ्यायला कोणी सांगीतले, तु वकिल आहेस का त्यांची, आता तुला संपवतोच’ असे म्हणुन सासू रेशमा यांचा दोन्ही हातांनी गळा आवळला. त्या गुदमरल्या आणि जीव वाचविण्यासाठी धडपड करुन स्वतःला त्यांच्या तावडीतुन सुटून न्हाणीच्या दिशेने गेल्या. तेव्हा रमेश चव्हाण यांनी मागुन येवुन त्यांचा जीव घेण्यासाठी त्यांच्या डोक्यात कोयता मारला. त्यावेळी सासूबाई पळत घराचे बाहेर रस्त्याला आल्या. रस्त्याने जात असताना त्या रमु परब यांचे घरासमोर चक्कर येवुन खाली पडल्या. रस्त्याला पडलेली असताना त्यांच्या गावातील काही जणांनी त्यांना पाणी पाजले व त्यांच्याकडील चारचाकीने सासूबाईना कुडाळ येथे दवाखान्यात दाखल केले.
दरम्यान या बाबत वैदेही विकास चव्हाण यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून कुडाळ पोलिसांनी रमेश गणपत चव्हाण यास ताब्यात घेऊन अटक केली. त्याला आज कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती साटम आणि पोलीस निरीक्षक आर. ए. मगदूम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.





