बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये लॉर्ड बेडन पॉवेल चिंतन दिवस उत्साहात

स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा 22 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘चिंतन दिवस’ म्हणुन जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या सत्रामध्ये शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कब-बुलबुल, स्काऊट गाईड यांच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना प्रास्ताविकात प्रशालेचे स्काऊट विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रोहिदास राणे यांनी चिंतन दिवसाचे महत्व विषद केले.
त्यानंतर गाईड कॅप्टन सौ. अश्विनी परब यांनी चळवळीचा इतिहास कथन केला. तर स्काऊट मास्तर विश्वजीत डांगमोडेकर यांनी स्काऊट चळवळ ज्या खांबांवर भक्कम पणे उभी आहे त्याचा ऊहापोह करीत ध्येय, खूण, हस्तांदोलन, प्रार्थना, ध्वजगीत व नियमांचे महत्त्व समजावून सांगितले.
त्यानंतर प्रशालेत अलीकडेच संपन्न झालेल्या निसर्ग निवास शिबिरार्थीना प्रशालेच्या प्राचार्या सौ. चैताली बांदेकर व उपस्थित शिक्षक वृंद सौ. मधुरा इन्सुलकर, सौ . प्राजक्त जाधव, सौ. शमिका भिसे, सौ. अदिती घाडी, सौ. रेश्मा घाडी व साईश गणाचारी. यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच गत वर्षातील जास्तीत जास्त खरी कमाई करणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमाणपत्र वितरण झाल्यावर सौ. चैताली बांदेकर यांनी आपल्या मनोगतातून ” उत्तम संस्कार, शिस्त आणि श्रमाची सवय लावण्याचे एक उत्तम माध्यम म्हणजे स्काऊट गाईड विभाग होय. स्काऊट गाईड विभागामार्फत सामाजिक बांधिलकीची सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जाते आणि विद्यार्थ्यांना समाजामध्ये मिसळण्याचे सुसंस्कार दिले जातात. एकोपा,स्वावलंबन आणि समायोजन, प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याची सवय आणि संस्कार दिले जातात. यासाठी विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड मध्ये सहभागी झाले पाहिजे.”असे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे नेटके नियोजन कब मास्तर मयुरेश लाड, स्काऊट मास्टर विश्वजीत डांगमोडेकर, रोहिदास राणे, फ्लॉक लीडर सौ. रुपश्री आळवे व कु. प्राजक्ता मेस्त्री यांनी केले होते.





