भाजपा प्रवेशानंतर सतीश सावंत पहिल्यांदाच नारायण राणेंच्या भेटीला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू, रखडलेल्या धरण प्रकल्प बाबत चर्चा

भाजप नेते खा.नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी बुधवारी मुंबई जूहू येथील अधिश निवासस्थानी भेट घेतली. खा. राणेंच्या प्रकृती गेले काही दिवस ठिक नव्हती. मुंबई येथे जावून सतीश सावंत यांनी खा. राणे यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी सौ.निलम राणे याही उपस्थित होत्या.
सिंधुदुर्गात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुक प्रचारा दरम्यान खा. राणे यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. अलिकडेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. जि.प. व पं.स. निवडणूकी दरम्यान सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच बुधवारी दुपारी सतीश सावंत यांनी खा. नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी हरकुळ बुद्रुकचे सरपंच आनंद ठाकूर, तुषार सावंत आदी उपस्थित होते. यावेळी खा. राणे यांनी विविध विषयावर चर्चा केली. विशेषतः रखडलेले धरण प्रकल्प आणि आंबा काजू बागायतदारांना उद्भवणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यावर चर्चा झाली. आपण लवकरच सिंधुदुर्ग येत असल्याचेही खा. राणे यांनी यावेळी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांची भेट घेणार असल्याचेही खा. राणे यांनी सांगितले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!