डॉ. शेखर भोजराज यांच्या दि स्पाईन फाउंडेशन मार्फत कणकवलीत मणक्याच्या मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे ७ मार्च रोजी आयोजन

दि स्पाईन फाऊंडेशन मुंबई, उपजिल्हा रूग्णालय कणकवली व डॉक्टर्स फ्रायडे क्लब यांचे आयोजन
कणकवली उपजिल्हा रूग्णालयात होणार हे मोफत तपासणी शिबीर
दि स्पाईन फाऊंडेशन मुंबई, उपजिल्हा रूग्णालय कणकवली व डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि.०७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते १.०० या वेळेत सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रामीण भागातील रूग्णांच्या मणक्याचे मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. रुग्णांच्या मणक्याची मोफत तपासणी झाल्यानंतर ज्या रूग्णांना मणक्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात येईल त्यांची शस्त्रक्रिया (ऑपरेशन) दि.२७ व २८ मार्च २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली या ठिकाणी मोफत करण्यात येणार आहेत.
दि स्पाईन फाऊंडेशन ही महाराष्ट्रातील एक नामवंत स्पाईन सर्जरी करणारी संस्था आहे. निष्णात स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची गेली ३० वर्षे वाटचाल चालू आहे. दि स्पाईन फाऊंडेशनमध्ये जवळपास ५० अनुभवी स्पाईन सर्जन आहेत. स्पाईन फाऊंडेशनची स्थापना १९९८ साली असून असून सध्या भारतभर त्यांची ३० सेवा केंद्र कार्यरत आहेत. मणक्याच्या आजारासाठी मोफत सेवा देणारी ही संस्था भारतातील एकमेव संस्था असून भारतातील अतिदुर्गम व आदिवासी पाड्यात कार्य करत आहे. मणक्याचे उपचार हे अत्यंत खर्चिक असल्यामुळे सामान्य रूग्णांना ते परवडत नाहीत. म्हणून ही देशव्यापी चळवळ चालू केलेली आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारी व सौराष्ट्र ते आसाम अशा पूर्ण भारतभर आपल्या वेगवेगळ्या सेवाकेंद्रामार्फत सेवा देत आहेत. डॉ. शेखर भोजराज यांनी असे स्पष्ट केले आहे की, ही चळवळ व्यक्तीकेंद्रीत नसून ‘गरज तेथे सेवा’ या ध्येयाने प्रेरीत आहे.
आपल्या सिंधुदुर्ग जिल्हयात्तील डॉ. प्रणित प्रकाश पावसकर (MS ORTHO SPINE SURGEON) कणकवली यांच्याजवळ सिंधुदुर्ग जिल्हयातील या शिबीरांची जबाबदारी आहे. डॉ. प्रणित प्रकाश पावसकर यांनी ग्रेड मेडिकल येथे MBBS पूर्ण करून स्वस्थियोग प्रतिष्ठान मिरज येथे MS ORTHO पूर्ण केलेले आहे. सध्या ते शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्पाईनमध्ये फेलोशिप करत आहेत.
यापूर्वी दि स्पाईन फाऊंडेशन मुंबई, उपजिल्हा रुग्णालय कणकवली व डॉक्टर्स फ्रायडे क्लब, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी अशाच प्रकारचे शिबीर आयोजित केलेले होते. त्या शिबीरामध्ये २१० रूग्णांची तपासणी करून १५ रुग्णांना मणक्याच्या सर्जरीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार १९ व २० डिसेंबर रोजी ११ रूग्णांवर उपजिल्हा रूग्णालय येथे मोफत सर्जरी करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे २ रुग्णांवर एकाचवेळी मानेच्या मणक्याचे व कंबरेच्या मणक्याचे सर्जरी करण्यात आल्या.
तरी सिधुदुर्ग जिल्हातील गरजू रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे दि स्पाईन फाऊंडेशन मार्फत डॉ. प्रणित पावसकर, मोबा. ९४२२५८०७४९ व डॉ. धनंजय रासम, मोबा.९१५८६९७३६२ डॉ. सर्वेश तायशेटे व श्री. रोशन कुळे, मोबा.७०४५८१४३४१ यांनी आवाहन केलेले आहे. या शिबीरासाठी वर दिलेल्या मोबाईल नंबरवर पूर्व नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. अशी माहिती डॉ. धनंजय रासम,डॉ. प्रणित पावसकर यांनी दिली.





