खारेपाटण मध्ये भीषण अपघात

अपघातात बहीण जागीच ठार ; भाऊ गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्ग वर खारेपाटण नजीक नडगीवे धुरी भाटलेवाडी बसस्टॉपजवळ मंगळवारी दुपारी सुमारे १२.३० वाजता कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात खारेपाटण जिजामातानगर येथील कु. तनिषा पुरुषोत्तम शेट्ये (वय १८) हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा भाऊ ऋतुपर्ण पुरुषोत्तम शेट्ये (वय २३) हा गंभीर जखमी झाला आहे. होळी आणि शिमग्याच्या सणादिवशीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे खारेपाटण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. पुरुषोत्तम शेट्ये हे एस.टी. महामंडळात चालक म्हणून कार्यरत असून तनिषा व ऋतुपर्ण ही त्यांची दोन मुले होत. होळीच्या निमित्ताने गावात उत्सव सुरू असताना ऋतुपर्ण हा घरी आला व घरातील जुनी अँबेसिडर कार (क्र. MH 09 AB 4339) घेऊन खारेपाटणहून तळेरेच्या दिशेने निघाला. नडगीवे धुरी भाटलेवाडी बसस्टॉपजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भारत बेंझ कंपनीच्या अवजड ट्रकला (क्र. MH 08 AP 4249) त्याने पाठीमागून जोरदार धडक दिली. संबंधित ट्रकचे चालक गणेश शशिकांत पाष्ट्ये (रा. नडगीवे) हे वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून घरी जेवणासाठी होते, अशी माहिती समोर आली आहे.धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कारमधील तनिषा हिचा जागीच मृत्यू झाला. चालक ऋतुपर्ण हा गंभीर जखमी झाला असून त्याला प्रथम कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करून जखमी व मृतदेह बाहेर काढला. खारेपाटण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मिलिंद देसाई, हवालदार अवधूत गुणीजन, चंद्रकांत झोरे, श्री. कदम तसेच वन विभागाचे विजय भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे व हवालदार राजेश गायकवाड यांनीही भेट देऊन पंचनामा केला. या दुर्घटनेतील मृतदेह खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शवगृहात ठेवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पुढील तपास खारेपाटण व कणकवली पोलिसांकडन सुरू आहे.

error: Content is protected !!