सिंधुदुर्गातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा!

फळपीक विमा योजनेचा पहिला हफ्ता दिवाळीपूर्वी मिळणार

शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना (सन २०२४-२५) संदर्भात काल कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे आणि फलोत्पादन मंत्री श्री. भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या माध्यमातून हि बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या तक्रारी मंत्री श्री.नितेश राणे यांनी कृषिमंत्र्यांसमोर सविस्तर मांडल्या. भारतीय कृषी विमा कंपनीच्या चालढकल कारभारामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यात होणारा विलंब लक्षात घेऊन मंत्री श्री.राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी तंबी देत कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. यावेळी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य करत, दिवाळीपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला हफ्ता वितरित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी विमा कंपनीला ही शेवटची संधी असून पुन्हा हलगर्जीपणा झाल्यास गय केली जाणार नाही असे ठणकावून सांगितले.

या बैठकीस अपर मुख्य सचिव श्री. विकास रस्तोगी, कृषी आयुक्त श्री. सुरज मांढरे, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक श्री. विनयकुमार औटी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री नाईक-नवरे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!