कुडाळ न. पं. च्या नूतन इमारतीसाठी ५ कोटी

न. पं च्या विशेष बैठकीत सकारत्मक चर्चा
कुडाळ नगरपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या विशेष सभेत न.पं.ची प्रशासकीय इमारत बांधण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यासाठी शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, ही इमारत सध्या असलेल्या नगरपंचायतीच्या जागेवरच बांधण्याचा निर्णय विचाराधीन आहे. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन आराखडा तयार करून पुढील निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.
ही विशेष सभा नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर, तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.
न.पं च्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी शासनाकडून २०२२ मध्ये पाच कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी गावठी आठवडा बाजार ठिकाणच्या शासकीय जागेची मागणी करण्यात आली होती. वारंवार पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतेही उत्तर न मिळाल्याचे प्रशासनाने सभेत सांगितले. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या न.प.च्या इमारत ठिकाणीच नवी इमारत उभारण्याचा पर्याय असल्याचे प्रशासनाकडून सुचित करण्यात आले. नगरसेवक निलेश परब यांनी न.पं.ने केलेल्या पाठपुरावा बाबतच्या पत्राच्या प्रती आपणाकडे द्याव्यात, अशी मागणी केली. तसेच इमारत बांधण्याला आमचा कोणताही विरोध नाही असेही त्यांनी सांगितले. नगरसेविका आफरीन करोल व श्रेया गवंडे यांनी आहे त्याच ठिकाणी इमारत बांधायची झाल्यास समोरील रस्त्यालगतचे अतिक्रमण तसेच वाहतूक कोंडी प्रश्न याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले.
नगरसेवक उदय मांजरेकर यांनीही या चर्चेत भाग घेतला. सर्वांनीच आमचा इमारत बांधण्याला कोणताही विरोध नाही, पण इमारत बांधत असताना, लोकप्रतिनिधींची वाहने, अग्निशमन दलाची गाडी सहज येईल याची दक्षता घेण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यावर नगरसेवक विलास कुडाळकर यांनी या चर्चेत सहभाग घेत, इमारतीसाठी मंजूर झालेले पाच कोटी रूपये तसेच पडून आहेत. त्यामुळे सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन आहे त्याच ठिकाणी चांगली इमारत बांधण्याच्या दृष्टीकोनातून चांगले नियोजन करण्यात यावे, वाहन तळ तसेच अन्य प्लॅन तयार करून त्याचे सर्वांवर प्रेझेंटेशन करून निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली. तर अतिक्रमणाचा प्रश्न येत असेल तर हा प्रश्न विशेष बैठक लावून सोडवूया असे नगराध्यक्ष बांदेकर-शिरवलकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली. शासकीय जागा ताब्यात घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. नगरसेवक मंदार शिरसाट, गणेश भोगटे, राजीव कुडाळकर, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, चांदणी कांबळी, नयना मांजरेकर उपस्थित होत्या.





