खारेपाटण महाविद्यालयात क्रांती दिन साजरा –

प्रेरणादायी व्याख्यानाने विद्यार्थ्यांना देशभक्तीची स्फूर्ती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण गावातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात क्रांती दिन नुकताच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. एनएसएस, एनसीसी आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी प्रमुख व्याख्याते प्रा. प्रणय माने यांनी ९ ऑगस्ट १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचा इतिहास, क्रांतीकारकांचे योगदान आणि आजच्या पिढीसाठी त्यातील प्रेरणा यावर सविस्तर भाष्य केले. त्यांच्या प्रभावी मांडणीतून स्वातंत्र्य संग्रामातील संघर्ष आणि बलिदान विद्यार्थ्यांच्या मनात जिवंत झाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांनी आपल्या प्रभावी भाषणातून विद्यार्थ्यांना देशप्रेम, एकता आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. यावेळी राजापूर तालुक्यातील शेजवळी गावाचे पोलीस पाटील श्री. पी. जी. शिंदे यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना राष्ट्रहितासाठी कार्यरत राहण्याची प्रेरणा दिली. तसेच एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा.रश्मी देसाई यांनी क्रांती दिनाचे सामाजिक आणि राष्ट्रीय मूल्य यावर भर दिला. मुंबई विद्यापीठाचे एनएसएस जिल्हा समन्वयक श्री. वसीम सय्यद यांनी तरुणांनी समाजकार्यात सक्रिय राहण्याचे आणि ऐतिहासिक दिवसांच्या स्मरणातून प्रगतीचा मार्ग शोधण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना इतिहास, देशभक्ती आणि सामाजिक कर्तव्याची जाणीव झाली. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. क्रांती दिनाच्या स्मरणातून देशहितासाठी योगदान देण्याची ऊर्जा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी कुमार सुयश मोरे यांनी केले. पाहुण्यांची ओळख कुमार प्रथमेश हरयाण यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षाली कानडे यांनी केले.

error: Content is protected !!