एस आर एम कॉलेजमध्ये टिळक पुण्यतिथीसह अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयातील मराठी विभाग, इंग्रजी विभाग, हिंदी विभाग आणि वाङ्मचर्चा चर्चा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्यावर आणि त्यांच्या साहित्यावर पोस्टर प्रदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी लिहिलेली ‘माझी मैना गावाकडं राहिली” ही रचना विद्यार्थ्यांनी सादर केली.
या निमित्ताने लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. व्ही. जी. भास्कर हे उपस्थित होते. डॉ. भास्कर यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळकांचा जीवनपट त्याचबरोबर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवन प्रवास, त्यांचे साहित्य त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये त्यांनी गायला या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून दिली. तसेच अण्णा भाऊ साठे एका कथेचा आशयही थोडक्यात कथन केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एन. लोखंडे यांनी देखील दोन्ही महापुरुषांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेसाठी बारा विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. शरयू असोलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.संतोष वालावलकर यांनी केले. आभार इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. भारत तुपेरे यांनी मानले. वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून हिंदी विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. एस. टी. आवटे आणि इंग्रजी विभागाचे डॉ. कमलाकर चव्हाण यांनी काम पहिले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!