सिंधू _ रत्न योजनेअंतर्गत गणेश मूर्तिकारांना अर्थसाह्याची रक्कम तात्काळ द्या!

कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे व मूर्तिकार संघटनेची कणकवली गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी
येत्या दोन दिवसात अर्थसाह्याची रक्कम जमा होणार
गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचे आश्वासन
सिंधू रत्न योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांना अर्थसाह्य देण्याच्या योजनेअंतर्गत मार्चमध्ये जिल्हा परिषद जवळ पैसे जमा होऊन देखील अद्यापही रक्कम मूर्तिकारांना मिळालेली नाही. गणेश मूर्तिकारांना सध्या अर्थसहाय्या ची गरज असताना ही रक्कम वेळेत मिळाली नाही तर त्याचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित करत भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष व कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांच्यासहित कणकवली तालुक्यातील गणेश चित्र शाळांमधील मूर्तिकार संघटनेच्या वतीने भेट घेत चर्चा केली. यावेळी गटविकास अधिकारी यांनी आजच यासंदर्भात ओरोस येथे बैठक असून येत्या दोन दिवसात ही रक्कम पात्र मूर्तिकारांच्या बँक खात्यावर जमा होईल अशी ग्वाही दिली.
सिंधू रत्न योजनेअंतर्गत गणेश मूर्तिकारांना अर्थसहाय्य देण्याची योजना गतवर्षी सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पैसे जिल्हा परिषद जवळ मार्चमध्ये जमा झाले. परंतु या संदर्भात प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही असा मुद्दा संतोष कानडे यांनी मांडला. तसेच या जिल्हा परिषदेच्या उदासीन भूमिकेवरही मूर्तिकार संघटने कडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावर या संदर्भात जिल्हा परिषद स्तरावर चर्चा करण्यात आली असून कणकवली तालुक्यातील 182 प्रस्तावना मंजुरी मिळाली आहे. व त्यानंतर देखील काही प्रस्ताव आले असून हे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती गटविकास अधिकारी श्री चव्हाण यांनी दिली. परंतु मूर्तिकारांना वेळीच अर्थसाह्य दिल्यास त्याचा उपयोग होणार आहे. माती मळणी यंत्र व कॉम्प्रेसर या दोन बाबींसाठी हे अर्थसहाय्य दिले जात होते. परंतु सुरुवातीच्या काळात 50 हजार रुपये प्रति मूर्तिकार अशी निकष होता. परंतु हे पैसे आता कमी झाल्याने मूर्तिकारांना निदान कमी झाले तरी पैसे वेळेत मिळाले पाहिजेत अशी मागणी श्री कानडे यांनी केली. त्यावर गटविकास अधिकारी श्री चव्हाण यांनी जिल्हास्तरावर या संदर्भात मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने जास्तीच्या मूर्तिकारांना लाभ मिळावा या हेतूने 20 हजार रुपये प्रति मूर्तिकार असा निकष करण्यात आला आहे. तसेच मूर्तिकारांनी कॉम्प्रेसर किंवा माती मळणी यंत्र घेतल्यावर त्या संदर्भातील जीएसटीचे बिल सादर करणे गरजेचे आहे. जिल्हास्तरावरून यासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. परंतु आजच्या घडीला मूर्तिकारांना असलेली गरज ओळखून ही वस्तुस्थितीची पडताळणी आठ दिवसानंतर केली जाईल. तत्पूर्वी आजच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून जिल्हास्तरावरून निधी तालुक्यावर वर्ग झाल्यानंतर ज्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे व त्यांची जीएसटीची बिले प्रस्तावासोबत सादर केली आहेत अशांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाईल अशी ग्वाही श्री चव्हाण यांनी दिली. त्यावर मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेअंतर्गत दिलेल्या निकषांमधील यंत्र खरेदी करण्याकरिता किमान 50 हजार रक्कम आवश्यक आहे. अन्यथा मूर्तिकारांना या मशनरी खरेदी करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. 20 रकमेमध्ये माती मळणी यंत्र किंवा कॉम्प्रेसर उपलब्ध होत नाही. त्यामुळे खिशातील पैसे या करता वापरावे लागणार आहेत. 31 मार्च पर्यंत प्रस्ताव करायला सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही प्रस्ताव दिले सोबत मशिनरी खरेदी करून बिले देखील जोडली परंतु जिल्हा परिषद कडून मूर्तिकारांच्या बाबतीत उदासीन भूमिका घेतली जात असल्याने मिळणारी हक्काची रक्कम आजही वंचित राहिली आहे. त्यामुळे या संदर्भात आता तरी दिरंगाई न होता तात्काळ मूर्तिकारांना हे अर्थसहाय्य उपलब्ध करून द्या अशी मागणी करण्यात आली. तर अनेक मूर्तिकार हे आर्थिक दृष्ट्या सक्षम नसताना देखील पारंपरिक चालत आलेली ही कला म्हणून हे काम करत असून तालुक्यातील 182 मूर्तिकारांपैकी ज्यांचे प्रस्ताव परिपूर्ण बिलांसहित सादर झाले आहेत अशा मूर्तिकारांना तात्काळ ही रक्कम अदा करण्यासाठी पाठपुरावा करा. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आमच्याकडूनही पाठपुरावा केला जाईल अशी माहिती यावेळी संतोष कानडे यांनी दिली. याप्रसंगी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, कणकवली तालुक्यातील मूर्तिकारांमध्ये रवी राणे, जितेंद्र दळवी, सागर मेस्त्री, मंगेश मेस्त्री, रवींद्र राणे, प्रफुल्ल तळेकर, सुभाष चाळके, नागेश मेस्त्री, भावेश गोसावी, नंदकुमार चव्हाण, सतीश मुरकर, स्वप्निल राणे, मयूर ठाकूर, प्रथमेश मठकर, विकास गुरव, श्यामसुंदर मेस्त्री, समीर हिंदळेकर आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली