कलमठ ग्रामपंचायत च्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची!

डंपर रुतल्याने वाहतुकीस अडथळा, रस्त्यांची दुरवस्था
ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांची ठेकेदारावर कारवाईची मागणी
कलमठ ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम नुकतेच करण्यात आले होते. त्या बदल्यात कंपनीने रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी ग्रामपंचायतीला 38 लाख 69 हजार 250/- इतकी भरपाई रक्कम दिली होती. या निधीचा वापर करून ग्रामपंचायत प्रशासनाने रस्ते व साईट पट्टी दुरुस्तीचे काम ठेकेदारामार्फत केले. मात्र, सदर काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेला पत्रकात त्यांनी म्हटले आहे, कलमठ बिडीयेवाडी, कलमठ भागात रस्त्याची दुरुस्ती अतिशय हलगर्जीपणे झाल्यामुळे मोठ्या वाहनांची वर्दळ बंद झाली आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, दुरुस्त केलेल्या रस्त्यावर डंपर रुतल्याने वाहतुकीची कोंडी झाली आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
या मी वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. मात्र, कामाच्या दर्जाकडे कुणीच गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने त्यांनी प्रशासनावर थेट जबाबदारी टाकली आहे. ग्रामविकास अधिकारी यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी योग्य रित्या करून दर्जा तपासणे गरजेचे होते, मात्र तसे न झाल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचे स्पष्ट होते. असेही श्री मेस्त्री यांनी म्हटले आहे. या बाबत ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे मागण्या करताना मेस्त्री यांनी म्हटले आहे,
सदर निकृष्ट कामाची ग्रामविकास अधिकारी यांनी तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा.
जबाबदार ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी.
भविष्यातील सर्व कामे ग्रामस्थांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली पार पाडावीत.
रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित योग्य पद्धतीने बुजवावेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल जाहीर करावा.या मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी दिला आहे.
कणकवली /प्रतिनिधी