कणकवली शहरात उघड्यावर कचरा टाकल्याप्रकरणी चंद्रेश फुटवेअर या दुकानदारावर दंडात्मक कारवाई

कणकवली नगरपंचायत च्या पथकाकडून धडक कारवाईचा इशारा
कणकवली शहरामध्ये उघड्यावर कचरा टाकल्या प्रकरणी “कोकण नाऊ” न्यूज चॅनेल च्या माध्यमातून वृत्तप्रसारित केल्यानंतर कणकवली नगरपंचायत प्रशासनाने त्याची दखल घेत कणकवली बाजारपेठेतील महापुरुष कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या चंद्रेश फुटवेअर या चप्पल दुकानदारावर 500 रुपयांची दंडात्मक कारवाई केली. कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाचे मुकादम प्रकाश राठोड व सफाई कर्मचारी तुषार कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कणकवली शहरात उघड्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यापारी व नागरिकांच्या विरोधात अशाप्रकारे कचरा टाकून शहराचे विद्रूपीकरण व शहरात अस्वच्छता पसरवल्याप्रकरणी उपविधी नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी यापूर्वी दिला होता. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली. यापुढे देखील कणकवली शहरात अशा प्रकारे उघड्यावर कचरा टाकल्यास अशीच कारवाई केली जाणारा असल्याचा इशारा नगरपंचायत कडून देण्यात आला आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली