कणकवलीत कार्यकारी अभियंता म्हणून काम करण्याचा आनंद सर्वाधिक!

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे प्रतिपादन
कणकवलीकरांकडून कार्यकारी अभियंत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
बांधकाम विभागातील सेवेला 17 जानेवारी 1986 सालामध्ये प्रारंभ झाला . कुठलेही काम करत असताना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल , त्यादृष्टीने काम करत राहिलो. राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणा जोपासला. त्यामुळे गेल्या 39 वर्षात सेवा बजावत असताना कुठेही मागे वळून पाहिले नाही . त्या त्या काळात असलेल्या सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी काम केले, त्या त्या ठिकाणी बांधकाम खात्याचे चांगले नावलौकिक होईल असेच काम केले. त्यामुळे कणकवलीत कार्यकारी अभियंता म्हणून काम करताना माझ्या सेवेतील सर्वाधिक आनंद मिळाल्याच्या भावना कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी व्यक्त केल्या .
कणकवली- हळवल येथील सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची 17 जानेवारी 2025 रोजी 39 वर्षे सेवा पूर्ण झाल्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने छोटेखानी सत्कार सोहळा करण्यात आला. या दरम्यान मत्स्य बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दुरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या . तसेच भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी , पत्रकार बांधव , ठेकेदार संघटना , सर्वसामान्य नागरिकांना श्री. सर्वगोड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या सत्कार प्रसंगी सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता श्रीनिवास बासुतकर , विनायक जोशी , कमलिनी जोशी , कार्यालयीन अधिक्षक सौ. पराडकर , कर्मचारी शैलेश कांबळी , सुशांत खेडकर, शुभम दुडये , करण पाटील आदी उपस्थित होते.