गोपुरी आश्रमात डॉ. मनमोहन सिंग यांना कृतज्ञता आदरांजली!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक मान्यवरांची उपस्थिती

भारताचे भूतपूर्व पंतप्रधान ज्यानी देशाला आर्थिक धोरणाच्या स्विकार्यतेतून आर्थिक समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न केला, त्या डॉ. मनमोहन सिंग यांचे अलीकडेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानिमित्त आज गोपूरी आश्रमात कृतज्ञता आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कृतज्ञता आदरांजली सभेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अॅड. मनोज रावराणे यांनी डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला दिलेल्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. जगातल्या पाच अर्थतज्ज्ञामध्ये मनमोहन सिंग यांचे नाव होते. त्यांनी देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा प्रात्यक्षिकरित्या प्रयत्न केला.
ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी यांनी मनमोहन सिंग यांनी मुक्त अर्थव्यवस्था आणल्यानंतर देशात अराजक माजेल अशी आमच्या पिढीला तरुण वयात शंका होती. आंम्ही त्या विरोधात विध्यार्थी संघटनेच्या वतीने मोर्चे पण काढले. परंतु आज त्यांच्या योगदानाची जाणीव आम्हाला झाली आहे, असे मत व्यक्त केले.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी मनमोहन सिंग यांनी देशाला अभूतपूर्व योगदान दिल्याचे सांगितले. प्रसाद घाणेकर यांनी मनमोहन सिंग यांनी अणुकराराच्या बाबतीत घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे आज भारताची जगात स्वतंत्र ओळख निर्माण झाल्याचे सांगितले. त्यावेळचे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांना अणुऊर्जेच्या बाबतीत निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार दिले होते. जगातील इतर देशांना त्यांच्या निर्णयाला चॅलेंज करता आले नाही. विरोधकांनी त्यांच्यावर अश्लाद्य भाषेत टीका केली, परंतु मनमोहन सिंग यांनी हार मानली नाही. प्रवीण शेवडे म्हणाले की त्यांनी जे देशाला योगदान दिले त्याचे मूल्यांकन त्यांना त्यांच्या हयातीत पाहायला मिळाले हा सुद्धा एक योगायोगच म्हणावा लागेल.
गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले की डॉ. मनमोहन सिंग कर्तव्य बुद्धीने राजकारणात आले. १९७२ नंतरची दोन दशके त्यांनी देशाच्या अधिकारी पदाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर काम केले. देशाला नवे वळण देणारा (जुन्या वळणाचा) माणूस म्हणून त्यांचा परिचय आहे.
त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळात जगात आर्थिक मंदी आली, परंतु भारताला या आर्थिक मंदीचा साधा स्पर्शही होऊ दिला नाही. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कालावधीत त्यांनी राबवलेल्या अणुऊर्जा करार, मनरेगा, आधार कार्ड, वस्तू व सेवा कर (GST) या धोरणावर विरोधकांनी अश्लाध्य भाषेत टीका केली. परंतु याच विरोधकांवर पुढच्या काळात ती धोरणे राबवण्याची वेळ आली, हा योगायोग म्हणायचा नाही का! परंतु त्यांनी हे ‘मी’ केले असे कधीच सांगितले नाही. डॉ. मनमोहन सिंग आपल्या सुसंस्कृत राजकारणाचा परिपाठ देशासमोर ठेवून गेले आहेत. त्याचे चिंतन वर्तमान काळातील राजकीय मंडळींनी करायला हवे, असे आव्हानही डॉ. मुंबरकर यांनी केले. यावेळी डॉ. सुनील परब, श्री राजेंद्र कदम यांनी मनोगत व्यक्त केले. या कृतज्ञता सभेला गोपुरी आश्रमाचे उपाध्यक्ष व्ही.के. सावंत, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, खजिनदार अमोल भोगले, संचालिका अर्पिता मुंबरकर, प्रकाश जैतापकर, विनायक सापळे, संदीप सावंत, संतोष कांबळे, अजय मोर्ये,प्रदीप मांजरेकर, निलेश गोवेकर यांच्यासहित जिल्हाभरातून अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव विनायक मेस्त्री यांनी केले.

error: Content is protected !!