कणकवली मतदारसंघात एकूण 9 नामनिर्देशन पत्र दाखल

आमदार नितेश राणें व संदेश पारकर यांच्यात होणार प्रमुख लढत
संदेश पारकर व संदेश परकर या नावांमध्ये साम्य असणारे दोन अर्ज
कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण आठ जणांनी नऊ अर्ज दाखल केले. यामध्ये आमदार नितेश राणे यांनी आपल्या एकाच नावाने दोन अर्ज दाखल केले आहेत. तर नोंदणीकृत पक्षांकडून दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांचा विचार करता भाजपाकडून आमदार नितेश नारायण राणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदेश भास्कर पारकर तर बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत आबाजी जाधव यांनी आपल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष म्हणून गणेश अरविंद माने, बंदेनवाज हुसेन खानी ,संदेश सुदाम परकर, प्रकाश दत्ताराम नारकर व विश्वनाथ बाबू कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये संदेश पारकर व संदेश परकर या नावांमध्ये साधरम्य असणारे दोन अर्ज दाखल झाले आहेत. कणकवली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज मंगळवारी तीन वाजेपर्यंत शेवटचा दिवस होता. तर उद्या दाखल झालेल्या उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार आहे. व त्यानंतर 4 नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली