कंत्राटी शिक्षक भरतीसाठी सेवानिवृत्त शिक्षकच का ?


सेवानिवृत्त शिक्षकांना अर्ज न करण्याचे कळकळीचे आवाहन.- विजय चौकेकर

महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्र . संकीर्ण २०२४ / प्र . क्र . ६६६ / टिएनटि -१ दि . ०५/ ०९ / २ ०२४ च्या शासन परिपत्रकाअन्वये प्राथमिक शाळेमध्ये वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये रिक्त पदावर पदवीधर बेरोजगार डिएड , बीएड मधून एक व सेवानिवृत्त शिक्षकांमधून एक असे दोन शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात रु १५ooo/- रु . मानधन तत्वावर नियुक्ती करण्याचे परिपत्रक जाहीर केले . या परिपत्रकामध्ये सेवानिवृत्त प्राथ शिक्षकाच्या वयाची कालमर्यादा ७० वर्षाची असणार आहे . तसेच तो सेवानिवृत्त शिक्षक राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून नियत वनोमानानुसार सेवानिवृत्त शिक्षक असावा . ज्या गटासाठी त्याची नियुक्ती करावयाची आहे त्या गटासाठी त्याच्या सेवाकालात अद्यापनाचे काम केलेले असावे . सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील .त्यानंतर गुणवत्ता वा योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदरचे नियुक्तीचे आदेश वाढीव कालावधी करीता दरवर्षी नुतणीकरण करता येईल . मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त ३ वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या ७० वर्षांपर्यंत या पैकी जे अगोदर घडेल तो राहील . करार पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक हा शारीरिक , मानसिक व आरोग्याचा दृष्टिने सक्षम असावा . प्राथमिक शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारीअधिकारी हे सेवानिवृत्त प्राथ शिक्षकांडून आवेदनपत्र मागवून घेऊन पात्र व ईच्छून उमेदवारांमधून नियुक्तीचे आदेशा देणार आहेत .
मित्रानो,सध्या राज्यातच नव्हे तर देशात शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेली अनेक वर्षांपासून उच्च विद्याविभूषित बेरोजगार युवक नोकरीविना बेकार आहेत. D. ed, B. ed./ M. ed. Ph. D. ,B. E. झालेल्या हजारो युवकांना महिन्याला 10,000/- रु ची देखील नोकरी भेटणे दुरापास्त झाले आहे. B. E. झालेले,B. ed, M. ed, even ph. D. झालेले अनेक युवक class 4 च्या पदासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही जणांनी चपराशीची नोकरी देखील नाइलाजाने स्वीकारली आहे.यामुळे कार्यालयांना उच्च शिक्षित व डॉक्टरेट चपराशी उपलब्ध होत आहेत. हि बेरोजगार मुले नोकरीसाठी उपोषणे आंदोलनेही सतत करीत आहेत . पण शासन आश्वासना पलिकडे काहीच करीत नाही .ऐकायलाच किती विषण्ण झाल्यासारखे वाटते ना. हि आहे सध्याची स्थिती..
बेरोजगारीच्या या भस्मासुरात आपली नवीन पिढी फार भाजून निघत आहे. अनेकांचे वय वाढले, नोकरी किंवा रोजगार नाही म्हणून लग्न नाही.. लग्न नाही म्हणून वैफल्य.. त्यातून आत्महत्येसारख्या अनेक घटना, आणि अशा अनेक समस्यांनी ही पिढी वाम मार्गाला जात आहे.या बाबत आपण सर्व विदित आहातच.
माझ्या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना नम्र व कळकळीचे आवाहन आहे की सरकार खूप हुशार आहे. सेवा निवृत्ताना घेतले तर, संघटना नाही, आंदोलन नाही, आम्हाला नियमित करा म्हणून बोंब नाही, कोर्ट मॅटरचा प्रश्न नाही.. मानधन कधीही दया उपोषणाला बसणार नाहीत . म्हणून सेवानिवृत्ताना संधी देत आहे.ही बाब योग्य नाही. हा बेरोजगरावर अन्याय आहे. मात्र या सर्व बेरोजगारांचा विचार करून आपण आवेदनच भरतेच नाही, तर आपोआपच तेवढया जागा बेरोजगार युवकांना भेटतील. व त्यांना रु. १५ooo/- रु चा तात्पुरता का होईना रोजगार मिळेल. आपल्यापेक्षा ते गतीने काम करतील. काही जणांचे अडलेली लग्न जुळतील.त्यांना आधार होईल. ते मनातून आपले मंगल होवो, असे म्हणतील. आपल्यालाही आपण एका बेरोजगार युवकास संधी दिल्याचे समाधान होईल.
म्हणून माझे आपणा सर्वांना नम्र आवाहन आहे.. या मानधानावरील पदाकरिता आपण आवेदन करूच नका. संधीं देऊ या बेरोजगारांना .आपल्या मुलांना. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने किमान वासरू मारू नये. या न्यायाने तरी या कडे आपण बघू या. मला खात्री आहे. आपण शिक्षक होतो.अजूनही सामाजिक स्तरावर काही ना काही शिकविण्याचे काम करीतच आहोत.आपण इतके असंवेदनशील असूच शकत नाही. शिकविण्याची खूपच उर्मी आली,नी आपल्या गावातील शाळेत शिक्षक कमी असतील,तर बिना मानधनानेच आपण काही तास फुकट शिकवू या…खूप मोठे समाधान मिळेल यातून… दोन्ही बेरोजगार तरुणांना नियुक्ती दिल्यानंतर हवे तर त्यांना शाळेत जाऊन मार्गदर्शन करू या पण त्यांच्या तोंडातील घास हिरावून घेऊया नको .

आपल्यापैकी एखाद्यास १५००० / रु चा खूपच मोह होत असेल तर अशा शिक्षकास आपण समजून सांगू या… आपणापैकी कोणी अर्ज भरायला गेल्यास हात जोडून अर्ज न भरण्याची विनंती करूया. नाही ऐकल्यास गळ्यात हार घालूया. सायंकाळी घरासमोर घंटा नाद करुया..मात्र, ही वेळच आपण येऊ देणार नाही.याची मला खात्री आहे. शासनाला नम्र विनंती आम्हा निवृत्त शिक्षकांमध्ये वाद विवाद निर्माण न करता बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून द्यावा .त्यांचे भविष्य उज्वल करावे . तरी जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी पंधरा हजार रुपयांचा मोह सोडून बेरोजगार तरुणांना संधी उपलब्ध करून त्यांचे आशिर्वाद मिळवावेत असे आवाहन सेवानिवृत्त प्राथ. शिक्षक असोशिएशने मालवण तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे

error: Content is protected !!