मुंबई – गोवा महामार्गावर कुरियर वाहन लुटण्याचा प्रयत्न

गाडीवर दगडफेक आणि पाठलाग सुद्धा
कुडाळ पोलिसात सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा
मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळजवळ मंगळवारी मध्यरात्री थरारक घटना घडली. ब्लू डार्ट सर्विसचे कुरिअर वाहन (कंटेनर) लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. ही घटना मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास पणदूर परिसरात घडली.
कंटेनर चालक मनोज कुमार पाल एस. ओपन बैचेनलाल (वय ३१, रा. मिर्जापूर, उत्तर प्रदेश) यांनी याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, मुंबई–गोवा महामार्गावरून कंटेनर घेऊन जात असताना एका बलेनो कारमधून आलेल्या संशयित आरोपींनी कंटेनरचा पाठलाग सुरू केला. लुटीच्या उद्देशाने कुरिअर वाहन अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वाहन न थांबवता पुढे नेले. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयितांनी कंटेनरवर दगडफेक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सुजल सचिन पवार (रा. झाराप), राहुल अमित शिरसाट (रा. कुडाळ), प्रशांत नितीन सावंत व प्रज्वल नितीन सावंत (रा. वेताळ बांबर्डे), मंदार सोनू उमरकर (रा. कुडाळ) आणि राहुल सदानंद नलावडे (रा. पावशी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेनंतर पळून जाणाऱ्या बलेनो कारने कुडाळ शहरातील गीता हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, जिल्हा बँकेच्या एटीएम केंद्राचेही नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यालगत उभी असलेली एका वॅगनार कारलाही या बलेनोची धडक बसली. लुटीचा प्रयत्न, पाठलाग, दगडफेक आणि त्यानंतर झालेला अपघात या सर्व घटनांमुळे कुडाळसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास API जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.





