कवी अजय कांडर यांना कवयित्री आशा पिळणकर स्मृती काव्य पुरस्कार

18 जानेवारी रोजी बांदा येथे पुरस्काराचे वितरण
ज्येष्ठ कवी अजय कांडर यांना श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज पॅरामुर (तेलंगणा) आणि बांदा परिवारातर्फे देण्यात येणारा पहिला कवयित्री आशा पिळणकर स्मृती काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये, स्मृती चिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असून १८ जानेवारी २०२६ रोजी स. १०:३० वा. ‘स्वामी समर्थ हॉल‘ बांदा येथे होणाऱ्या पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळ्यात कांडर यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
कवयित्री आशा पिळणकर यांनी विपुल बाल साहित्य लिहिले. एक शिक्षिका म्हणून निष्ठेने सेवाभावी वृत्तीने काम केले. आता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी पिळणकर कुटुंबातर्फे त्यांच्या बाल साहित्याचे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले असून यावर्षीपासून कवयित्री आशा पिळणकर काव्य पुरस्कारही सुरू करण्यात आला आहे. या पहिल्या पुरस्कारासाठी कवी अजय कांडर यांची निवड करण्यात आली असून पुरस्कार वितरण समारंभात आशा पिळणकर यांच्या दोन बाल काव्यसंग्रहाचे आणि अच्युत पिळणकर यांनी लिहिलेल्या श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी महाराज या ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. अजय कांडर यांनी मराठी कवितेत सातत्याने गुणवत्तापूर्ण काव्य लेखन करून आपले योगदान दिले आहे. त्याचबरोबर कोकण तसेच महाराष्ट्राच्या विविध भागात त्यांनी साहित्य चळवळ सुरू ठेवून अनेक गुणवंत लेखक कवीना चांगल्या वाचकांसमोर आणण्याचे महत्त्वाचे कामही केले आहे. त्यामुळेच समकालीन मराठी कवितेतील एक महत्त्वाचे कवी अशी त्यांची ओळख आहे. आवानओल, हत्ती इलो, युगानुयुगे तूच, अजूनही जिवंत आहे गांधी हे चार कवितासंग्रह त्यांचे बहुचर्चित आहेत. अमेरिकेतून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा महाराष्ट्र फाउंडेशन तसेच जैन उद्योग समूहाचा एक लाख रुपयाचा बालकवी पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार असे अनेक महत्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. हिंदी, इंग्रजी, मल्याळम, उर्दू, कानडी, दख्खनी बोली, गुजराती, पंजाबी आदी भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कविता भाषांतरित झाल्या आहेत. विविध 12 विद्यापीठांच्या आणि एका शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला असून यातही बाया पाण्याशीच बोलतात या त्यांच्या एका बहुचर्चित कवितेचा चार विद्यापीठे आणि एका शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या कवितेवर एमफील, पीएचडीचे संशोधनही झाले आहे. तसेच भारतीय पातळीवरील अनेक बहुभाषिक साहित्य संमेलनात कविता वाचनासाठी त्यांना निमंत्रितही करण्यात आले आहे. या त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळेच त्यांना कवयित्री आशा पिळणकर पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याची माहिती पिळणकर कुटुंबातर्फे देण्यात आली आहे.





