“अश्वमेध”च्या पाच विद्यार्थ्यांचीराज्यस्तरीय ऍथलेटिक स्पर्धेत निवड
आचरा–अर्जुन बापर्डेकर
सिंधुदुर्ग जिल्हा ऍथलेटिक असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेत आचरेच्या अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या पाच विद्यार्थ्यांची पुणे बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल मैदान येथे मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी जिल्हा अध्यक्ष कल्पना तेंडोलकर, सचिव ताराचंद पाटकर आदी प्रशिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. ऍथलेटिक प्रकारातील स्पर्धांमधून विजेते ठरलेल्या प्रथम दोन क्रमांकाना राज्यस्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीच्या १६ वर्षाखालील वयोगटातून मेघा सातपुते हिने ६० व ६०० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक, राकेश शेठ याने लांब उडी प्रकारात द्वितीय, २० वर्षाखालील वयोगटात प्रथमेश पुजारे ३ किमी प्रकारात प्रथम तर मयुरेश पुजारेने ४०० मीटरमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला.
तर तेजस शेटये याने ८० मीटर हर्डल्समध्ये प्रथम तर 60 मीटर धावणे द्वितीय क्रमांक मिळविला. ‘ अश्वमेध ‘ च्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थापक सिद्धेश आचरेकर, प्रशिक्षक अनिकेत पाटील (एनआयएस), चंद्रकला सातपुते, स्वाती आचरेकर यांनी अभिनंदन केले आहे.